Pimpri: पालिका कर्मचाऱ्यांसाठी विमा पॉलिसी नको, ‘धन्वंतरी’ योजनाच ठेवा – अण्णा बनसोडे

No insurance policy for municipal employees, just keep 'Dhanvantari' scheme - Anna Bansode

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी महासंघाचा विमा पॉलिसीला विरोध आहे. त्यांना धन्वंतरी योजनाच हवी आहे. कर्मचारी वर्गासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी योग्य योजना असावी. त्यांच्या मागणीनुसार धन्वंतरी योजनाच कायम ठेवावी, अशी सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

याबाबत आमदार बनसोडे म्हणाले कि, महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य खर्च प्रतिपूर्ती म्हणून धन्वंतरी योजना अस्तित्वात होती. परंतू, पालिकेने विमा एजंट कंपनी मार्फत गट विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी निविदा काढली.

त्याप्रमाणे के. एम. दस्तूर या विमा एजंट कंपनी मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीची ३१ कोटी रुपये खर्च करून पॉलिसी खरेदी करण्यात येणार आहे. परंतू, कर्मचारी महासंघाचा याला विरोध असून धन्वंतरी योजना सुरु ठेवावी, अशी मागणी महासंघाने केली होती.

त्याअनुषंगाने कोविड 19 साथ नियंत्रणात येईपर्यंत विमा पॉलिसी खरेदी करण्यात येऊ नये. धन्वंतरी योजना कायम ठेवण्यात यावी. विमा एजंट कंपनीच्या फायद्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून विमा पॉलिसी रक्कम व धन्वंतरी योजनेतून होणारा खर्च यात मोठी तफावत आहे.

त्यामुळे पालिकेचे नुकसान होताना दिसत आहे. विमा कंपनी अनेक विकार/आजार स्विकारत नसल्याने कर्मचारी वर्गास या पॉलिसी संपूर्ण लाभ होणार नसल्याचे कामगार संघाचे मत आहे.

विमा पॉलिसी घेण्यापूर्वी विमा पॉलिसी व धन्वंतरी योजना यांच्यामधील फरक तुलनात्मक तक्त्यासह प्रेझेन्टेशनद्वारे दाखविण्यात यावे. कोणत्याही निर्णयापूर्वी ज्या घटकासाठी ही योजना आहे. त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचारी महासंघासही विश्वासात घेण्यात येऊन होणाऱ्या निर्णयास कर्मचारी महासंघाची मान्यता असावी.

एकंदरीत धन्वंतरी योजना सुरु ठेवण्यासाठी महासंघ आग्रही असल्याचे दिसून आले. तर, एजंट विमा कंपनीच्या प्रतिनिधीनेही प्रस्तावनेत धन्वंतरी योजना चांगली असल्याचा उल्लेख करून पॉलिसी उपयुक्त असल्याची माहिती दिली. कर्मचारी वर्गासाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी योग्य योजना आमलात आणावी, असे बनसोडे यांनी सांगितले.

7500 मनपा कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी ३०० रुपये वर्गणी देतात. तर, निवृत्त 150 कर्मचारी 150 रुपये वर्गणी भरत असून पालिका दुप्पट 600 रुपये हिस्सा भरते. कर्मचारी वर्गणी व मनपा हिस्सा मिळून अंदाजे 10  कोटी रुपये जमा होतात.

तर धन्वंतरी योजनेवर सरासरी पालिकेने 17  कोटी रुपये खर्च केलेला असून दुप्पट खर्च करून पालिकेने विमा पॉलिसी खरेदी न करता सुधारीत धनवंतरी योजना आणावी अशी महासंघाची मागणी असल्याचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले.

बैठकीस आमदार बनसोडे व आयुक्त हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्यासह कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे व सदस्य सुरेश गारगोटे, अविनाश ढमाले, बाळासाहेब कापसे, सुप्रिया सुरगुडे, योगेश रसाळ, योगेश वंजारी व विमा एजंट कंपनी मार्फत देशपांडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.