Pimpri : …यापुढे डिटर्जेन्टमुळे फेसाळणार नाहीत देशातील नद्या!

एमपीसी न्यूज – नदीला घातक असणाऱ्या डिटर्जेन्टसमधील फॉस्फेटची कमाल मर्यादा निश्चित करण्यास पर्यावरण बी.आय.एस मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या निरंतर 2 वर्षाच्या प्रयत्नांना अखेर यश.

डिटर्जेंटसमध्ये असणाऱ्या फॉस्फेटचे प्रमाण नद्यामधून दिसणाऱ्या फेसाळ पाण्याला जबाबदार असल्याचे जलप्रदूषण चा अभ्यास करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या गणेश बोरा, प्रदीप वाल्हेकर, सोमनाथ हरपुडे व टिम च्या अभ्यासातून निष्पन्न झाले. दररोज वापरात येणाऱ्या साबण, डिटर्जेन्टमध्ये असणाऱ्या घातक फॉस्फेट मुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे.

याबाबत सखोल अभ्यास करता असे आढळले की डिटर्जेंटस मधील फॉस्फेटचे असणारे जास्त प्रमाण हे या मागचे मुख्य कारण आहे, तसेच घरातुन शहरातील नदीत सोडले जाणारे सांडपाणी व मैलापाणी नद्याना मोठ्या प्रमाणावर प्रदुषित करत असल्याचे निष्पन्न झाले.अश्या पद्धतीने होणारे प्रदुषण हे औद्योगिक प्रदुषणा पेक्षा भिषण असल्याचे बोरा सांगतात.

वेगवेगळ्या पाठपुराव्यानंतर भारतीय मानक ब्युरोने प्रलंबित दुरुस्तीस मंजुरी दिली आहे. नवीन मानांकना नुसार डिटर्जेंटस मधील फॉस्फेटची पातळी कमाल २.५ % ते ५ % असावी असे ठरवण्यात आले आहे. यापुर्वी भारतीय मानक ब्युरो (बी आय एस) ने १९६८ साली घालून दिलेल्या डिटर्जंट मधील कमाल फॉस्फरस वापराच्या मर्यादेचा कोणताही उल्लेख नव्हता.

सध्या दुरुस्ती मुद्रण टप्प्यात आहे त्यानंतर डिटर्जंट उत्पादन उद्योगांना या बीआयएस मानकांच्या मर्यादेचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. या बदलांमुळे देशातील नद्यांनमध्ये दिसणारा प्रदूषित फेस आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे गणेश बोरा यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.