Pimpri : उद्योगांसाठी पुन्हा ‘लॉकडाउन’ नको; दीपक फल्ले यांची मागणी

No more ‘lockdown’ for industries; Demand of Deepak Falle :उद्योगांसाठी पुन्हा लॉकडाउन फायद्याचा ठरणार नाही

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र, मोठ्या ब्रेकनंतर उद्योग चक्र हळूहळू पुन्हा रुळावर येत असताना उद्योगांसाठी पुन्हा लॉकडाउन फायद्याचा ठरणार नाही, असे मत पिंपरी चिंचवड लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी मांडले आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात सोमवारी (दि. 13) मध्यरात्री पासून दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याची माहिती ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली. दरम्यान, या दहा दिवसात दूध आणि मेडिकल सेवा वगळता कारखाने, दुकाने सर्वच बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योग विश्वातून मात्र याबाबत काहीसा नाराजीचा सूर उठत असून आत्ताच कुठे उद्योगाचे चक्र रुळावर येत असताना उद्योगांसाठी पुन्हा लॉकडाउन फायद्याचा ठरणार नाही, भावना उद्योजक व्यक्त करत आहेत.

पिंपरी चिंचवड लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष दीपक फल्ले म्हणाले, आर्थिक आणि कामगारांची विस्कटलेली घडी आता कुठे बसायला सुरवात झाली असताना उद्योगांसाठी पुन्हा लॉकडाउन करणे योग्य ठरणार नाही.

देशात 23 मार्च रोजी लॉक डाउन लागू केल्यानंतर तब्बल दोन महिन्यापेक्षा जास्त काळ उद्योग बंद ठेवण्यात आले होते. त्यांनतर सरकारने सशर्त उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली.

आर्थिक संकट आणि कामगार तुटवडा यांचा सामना करत उद्योग पुन्हा सुरु झाले. मात्र, उद्योग विश्वासाठी आणखी एक लॉकडाउन फायद्याचा ठरणार नाही, अशी भावना फल्ले यांनी व्यक्त केली.

फल्ले पुढे म्हणाले, उद्योजकांसमोर कामगारांचे पगार, बँकेचे हफ्ते यासारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यात कुशल कामगार मिळत नसल्यामुळे उद्योजकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

कामगारांच्या सुरक्षेला कंपनीत प्राधान्य दिले जात आहे. सोशल डिस्टंसिन्ग आणि कामगारांना ये – जा करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते.

तसेच, पिंपरी चिंचवड मधील कोणत्याही कंपनीत कोरोना रुग्ण सापडल्याची घटना समोर आली नाही. त्यामुळे उद्योगनगरीत नियमांची कडक अंमलबजावणी होत असताना उद्योग बंद ठेवणे योग्य ठरणार नाही, असे मत फल्ले यांनी व्यक्त केले.

उद्योग सुरु झाल्याने शहरात आलेल्या कामगारांसमोर सुद्धा आर्थिक संकट उभे राहणार आहे. त्यामुळे उद्योगांसाठी सध्या पुन्हा लॉकडाउन नको, अशी मागणी दीपक फल्ले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.