Pimpri : 31 डिसेंबरला रुफ टॉप पार्ट्यांना परवानगी नाही

मद्य विक्रीची आउटलेट दीड तर हॉटेल्स पहाटे पाच वाजेपर्यंत राहणार उघडी

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या आदेशानुसार हॉटेल्सच्या रुफ टॉपवर केल्या जाणा-या पार्ट्यांना प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मोकळ्या आणि बंदिस्त जागेत 31 डिसेंबरच्या पार्टीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्य विक्रीची परवानाधारक दुकाने पहाटे दीड वाजेपर्यंत तर हॉटेल्स पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

तरुणाईने मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे. नववर्षाचे स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी प्रशासन देखील विविध पातळ्यांवर सज्ज झाले आहे. हॉटेल, मद्य विक्रीची दुकाने यापासून ते मद्यपींवर होणा-या करवायांबाबत देखील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या 15 पोलीस ठाण्यांमध्ये 15 ब्रेथ अॅनालायझर आहेत. त्यापैकी आठ नादुरुस्त आहेत. तसेच ऑनलाइन चलन करण्यासाठी 63 यंत्रे आहेत. आणखी 145 यंत्रांची मागणी पोलिसांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे वाहनचालक तळीरामांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

शहरात होणा-या बेकायदेशीर दारु विक्रीवरही कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी केलेल्या कारवाईत बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 240 लिटर गावठी, 140 लिटर ताडी व झेनकार असा 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील मुख्य ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आयुक्‍त आर के पद्मनाभन म्हणाले, “रात्री मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अनेकदा अपघात होतात. फक्‍त 31 डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यास मोठा विरोध होतो. यामुळे गुरुवारपासूनच (दि. 27) मद्यपी चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांना केल्या आहेत. पोलीस निरीक्षक स्वतः या कारवाईवर लक्ष ठेवून असतील”

दरम्यान, मद्यविक्रीचा परवाना नसताना नववर्ष स्वागताच्या पार्टीमध्ये मद्यविक्री केल्यास कार्यक्रमांचे आयोजक आणि संबंधित जागामालक या दोघांवरही कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून शहरासह जिल्ह्य़ात अवैध मार्गानी आलेल्या मद्यसाठय़ांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे घालण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.