Pimpri : शासकीय कर्तव्यांदरम्यान धार्मिकतेचा हस्तक्षेप नको – माधव भंडारी

एमपीसी न्यूज – धार्मिक आचार, विचार ही व्यक्तिगत बाब आहे. ती इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. तसेच शासकीय कर्तव्ये पार पाडताना धार्मिक बाबींचा हस्तक्षेप होता कामा नये, असे मत महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणचे माधव भंडारी यांनी व्यक्त केले.

श्रीमन महासाधु श्री मोरया गोसावी यांच्या 458 व्या जयंतीनिमित्त माधव भंडारी यांचे ‘धर्मनिरपेक्षता’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त विश्राम देव, विघ्नहरी देव, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते.

माधव भंडारी म्हणाले, “भारतात धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ आजवर वेगळ्या पद्धतीने लावला गेला. एका विशिष्ट धर्माला मह्त्त्व दिलं गेलं. त्याव्यतिरिक्त कोणत्याही धर्माकडे बघायचं नाही, असं सूत्र ठरवलं गेलं. यामुळे धर्मनिरपेक्षता या शब्दाचे सर्वात जास्त वाभाडे निघाले आहेत. भारताची फाळणीच धर्मनिरपेक्षतेवर आधारित झाली आहे. त्यामुळे शासन आणि नागरिकांनी धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. भारताची हिंदू संस्कृती पूर्वीपासून धर्मनिरपेक्ष आहे. पाश्चिमात्य देशात पोप हाच सर्वश्रेष्ठ असतो. त्याचे तिथे वर्चस्व असते. व्हॅटिकन सिटी हे पोपने बसवलेलं शहर आहे. ते तिथल्या राजकीय जीवनात हस्तक्षेप करतात. त्यांनी स्वतःकडे धर्मसत्ता आणि राजसत्ता ठेवली आहे. पण आपल्याकडे अशी परिस्थिती नाही. आपल्याकडे दोन्ही सत्ता वेगवेगळ्या आहेत. पंथ निरपेक्षता, उपासना, निरपेक्षता हा हिंदू संस्कृतीचा गाभा आहे. मागील काही वर्षांपासून भारताची धर्मनिरपेक्षता धोक्यात असल्याचे बोलले जाते. पण असा कोणताही प्रकार भारतात झाला नाही. उलट धर्माच्या नावावर चालणारे प्रकांड बंद झाले आहेत, असेही भंडारी म्हणाले.

अयोध्या निकालाचा तपशील सांगताना माधव भंडारी म्हणाले की, अयोध्या, मथुरा या शहरांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. यापेक्षा मोठा पुरातन इतिहास असलेली जिवंत शहरे जगात कुठेही नाहीत. मधल्या काळात झालेल्या वेगवेगळ्या आक्रमणांमुळे काही मंदिरे पाडली गेली. पण तीच मंदिरे पुन्हा उभी देखील झाली. राम जन्मभूमी – बाबरी मशीद प्रकरण तब्बल 151 वर्ष न्यायालयीन प्रक्रियेत होते. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पूर्णतः धर्मनिरपेक्ष आहे. हा वाद जमिनीचा आहे. त्यामुळे इतर बाबींचा विचार न करता दिलेला हा निकाल आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात जमिनीच्या संपूर्ण मालकीचे प्रकरण असताना न्यायालयाने तिघांना जमिनीची वाटणी केली. त्यामुळे तिघांनाही हा निकाल मान्य झाला नाही. म्हणून तिघांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने 1861 पासूनचे कागदपत्र पडताळले. त्या सर्व कागदपत्रांवर राम जन्मभूमीचा उल्लेख आढळला. भारतात काही ठिकाणी बाबरी मशीदी आजही सुरू आहेत. त्याबाबत कोणत्याही नागरिकाचा कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. कारण तिथं मुस्लिमांचा धार्मिक वावर आहे. याची कागदोपत्री सुद्धा नोंद आहे. सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या समाजाला बरं वाटावं म्हणून कोणतेही निर्णय घेतले नाहीत. या निकालानंतर ‘भारतातील धर्मनिरपेक्षतेला धक्का लागला’ असं चित्र उभारण्याचा प्रयत्न झाला. सुज्ञ समाज अशा भ्रामक आणि समाजात तेढ निर्माण करणा-या संकल्पनांमधून बाहेर पडून ख-या अर्थाने धर्मनिरपेक्ष होत आहे. धर्माचे सांगितले जाणारे चुकीचे अर्थ समाजाला समजू लागले आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.