Pimpri : पीएमपीएमएल संचालक मंडळाची महापालिकेत बैठक निष्फळ ; अनेक विषयांवर केवळ चर्चा

पुन्हा गुरुवारी बैठक

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक वर्षापासून असलेली आग्रही मागणी मान्य करत, पीएमपीएमएल संचालक मंडळाची बैठक पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात पार पडली. मात्र, पीएमपीएमएल प्रशासनाकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याने ही बैठक येत्या गुरुवारी (दि.11) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. केवळ विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत अनेक प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.

पीएमपी संचालक मंडळाच्या या बैठकीला संचालक महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्‍ता टिळक, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पुण्याचे स्थायी समिती सभापती सुनील कांबळे, संचालक सिद्धार्थ शिरोळे, पीएमपीएलच्या तथा व्यस्थापकीय संचालिका नयना गुंडे, आयुक्‍त तथा संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत पीएमपीला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. टाटा मोटर्सकडून खरेदी केल्या जाणाऱ्या 200 बसपैकी केवळ सहा बस तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट अखेर पीएमपीच्या ताफ्यात या बस दाखल होण्याची शक्‍यता नसल्याने गुरुवारी होणाऱ्या बैठकीत टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनादेखील याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी बोलविले जाणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले असून, शहरातील पर्यटनस्थळांबरोबरच वारकरी सांप्रदायाच्या देहू-आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यावर चर्चा करण्यात आली.

याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी आवश्‍यक असलेला साडेचार कोटींचा निधी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी 60-40 या हिश्‍यानुसार देण्याचा विचार करावा. मात्र, त्यासाठी पीएमपी प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलावर मध्यम मार्ग कसा काढता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे संचालक मंडळांनी सुचविले. याशिवाय तत्कालीन व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पीएमपीमधील 29 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची सुनावणी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत घेतली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.