Pimpri: सूचना नाही, अनुमोदन नाही अन् महासभा तहकूब; भाजपकडून सभाशास्त्राचे धिंडवडे!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सभाशास्त्रांचे धिंडवडे काढले आहेत. खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादनाचा विषय तहकूब करण्याला भाजप नगरसेवकाने विरोध करताच कोणतीही सूचना आणि अनुमोदन नसताना महापौरांनी अचानक महासभेचे कामकाज तहकूब केले. महापौरांनी तहकुबीची तारीख सांगितली नसल्याने नगरसचिवांनी सभा तहकुबीची तारीख कळविली जाईल, असे नगरसेवकांना सांगितले. परंतु, काही नगरसेवक सभागृहात बसून राहिल्यानंतर अर्ध्या तासांनी महापौर सभागृहात आल्या. त्यावेळीही कोणीतीही सूचना न मांडता महापौरांनी सभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब केले.

सन 2019 मधील डिसेंबर महिन्याची तहकूब सभा आज (सोमवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादन करताना नूकसान भरपाई देण्याची कार्यपद्धतीत व धोरण महापालिकेने 2013 मध्ये निश्चित केले आहे. त्यात सन 2015 मध्ये बदल करण्यात आला होता. आता सत्ताधारी भाजपने पुन्हा या धोरणात नव्याने बदल करण्याचे ठरविले आहे. याबाबतचा ठराव स्थायी समितीत 27 नोव्हेंबर 2019 रोजी पारित करण्यात आला आहे. या ठरावावरुन भाजप नगरसेवकांमध्ये दुफळी आहे. या ठरावावरुन महासभा वारंवार लांबणीवर टाकली जात आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा झाली.

विषयपत्रिकेवर पहिल्याच क्रमांकाला हा विषय होता. भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये हा प्रस्ताव तहकूब करण्याचे ठरले होते. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी तसा व्हीप देखील नगरसेवकांना बजाविला होता. भाजप नगरसेवक सागर अंगोळकर यांनी खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादनाचा विषय वाचला. त्याला अंबरनाथ कांबळे यांनी अनुमोदन देताच महापौर ढोरे यांनी तहकूब केल्याचे सांगितले. तहकुबीला आक्षेप घेत भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापौरांसमोरील हौदामसमोर धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केल्या. त्यानंतर कोणतीही सूचना आणि अनुमोदन नसताना महापौरांनी महासभा तहकूब असे जाहीर केले अन त्या आसनावरुन उठून गेल्या.

त्यानंतर काही वेळाने नगरसचिव उल्हास जगताप यांनी महापौरांनी महासभा तहकूब केली आहे. तहकुबीची तारीख नंतर सांगितली कळविली, असे नगरसेवकांना सांगितले. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी हारकत घेतली. कोणत्या नियमाच्या आधारे सभा तहकूब केली आहे. भाजपकडून मनमानी पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने, नियमाला तिलांजली देत सभेचे कामकाज केले जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी भाजप नगरसेवकांना सभा तहकूब झाली असून सभागृहाबाहेर येण्याचे आवाहन केले. त्यानंतर देखील राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेविका सभागृहात बसून होत्या.

तब्बल अर्धा तासानंतर महापौर ढोरे सभागृहात आल्या. त्यांनी आजची महासभा शुक्रवार (दि. 10) दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले. दुस-यावेळी देखील कोणीतीही सूचना न मांडता महापौरांनी सभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब केले. महापौर ढोरे यांची पहिली सभा तहकूब झाली होती. कामकाजाची आजची त्यांची सभा देखील गोंधळातच तहकूब झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.