Pimpri : नियंत्रण कक्षाकडून प्रतिसाद मिळेना; मारहाण झालेल्या नागरिकाचा मनस्ताप

एमपीसी न्यूज – मोटारसायकल घरात लावत असताना ‘रस्त्यावरून कोणी गेले आहे का’ असे विचारत दोन तरुणांनी मिळून दोघा भावंडांना मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 27) पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथे घडली. मारहाण झाल्यानंतर पोलिसांची मदत घेण्यासाठी नियंत्रण कक्षाला 100 नंबरवर फोन केला असता फोनवर कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फिर्यादी नागरिकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

संजय बुलचंद फेरवानी (वय 34, रा. मेन बाजार, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय आणि त्यांचे भाऊ बुधवारी पहाटे दुचाकीवरून येत होते. ते त्यांच्या घराजवळ आले. दुचाकी घरात लावत असताना त्यांच्या मागून दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यातील एकाने ‘इथून कोणी पळत गेले आहे का’ असे विचारले. त्याला संजय यांनी ‘कोणीही गेले नाही’ असे सांगितले असता आरोपी दोघांनी मिळून संजय यांना मारहाण केली. तसेच घरात जाऊन तोडफोड केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, घटना घडल्यानंतर फिर्यादी संजय यांचे भाऊ मुकेश बुलचंद फेरवानी यांनी 100 क्रमांकावर फोन केला असता पोलिसांकडून काहीही प्रतिसाद देण्यात आला नाही. बराच वेळ झाल्यानंतर त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक इंटरनेटच्या माध्यमातून शोधला आणि पिंपरी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांशी संपर्क केला असता काही वेळेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नियंत्रण कक्षाला (100) फोन केला असता प्रतिसाद न दिल्याने त्यांना बराच वेळ मनस्ताप सहन करावा लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.