Pimpri: वैद्यकीय विभागप्रमुखांच्या नाकर्तेपणामुळे नॉन कोविड रुग्णांचे हाल, सक्षम अधिकाऱ्यांकडे जबाबदारी द्या – संदीप वाघेरे

Non-covid patients due to reluctance of medical department head, give responsibility to competent authorities - Sandeep Waghere :

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वैद्यकीय विभागात भोंगळ कारभार सुरु आहे. नॉन कोविड रुग्णांसाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाशी केलेल्या कराराचे या विभागाने तब्बल 23 दिवस उलटले तरी नुतनीकरण केले नाही. यामुळे सर्वसामान्य आजार असलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे.  वैद्यकीय विभागप्रमुखांच्या नाकर्तेपणामुळे करदात्यांना उपचारासाठी 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च करावा लागत असून महापालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे या कराराचे तत्काळ नुतनीकरण करण्यात यावे. वैद्यकीय विभागाचा पदभार सक्षम अधिका-याकडे सोपवावा, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे की, शहरातील नागरिकांना कोविडच्या उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे पालिकेमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार बाधित रुग्ण येथे उपचार घेत आहेत. परंतु, इतर आजारांसाठी शहरातील नागरिकांना उपचार करण्याकरिता डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासमवेत करारनामा केला होता. त्यानुसार फक्त पालिका रुग्णालयातील रुग्णांना मोफत उपचार पुरविले जात होते.

तथापि, हा करारनामा 30 जून रोजी संपुष्टात आल्याने नागरिकांना मोफत उपचारापासून वंचित राहावे लागत आहे.

_MPC_DIR_MPU_II

हा करार संपुष्टात आल्याने रुग्णांना उपचारासाठी 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. करदात्यांना त्याचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. वैद्यकीय विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांवर ही वेळ आली आहे.

वैद्यकीय विभागाच्या प्रमुखांनी करारनामा संपुष्टात येण्यापूर्वी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. परंतु, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे करारनामा करण्यात आलेला नाही. रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचे काम सध्या सुरू आहे.

वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील रुग्णांना मोफत उपचाराला मुकावे लागत आहे.

त्यामुळे वैद्यकीय विभागाचा पदभार सक्षम अधिका-यांकडे सोपवावा. जेणेकरून नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरवणे शक्य होईल. तसेच नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, असे नगरसेवक वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.