Pimpri: ‘होम क्वारंटाईन’ची सोय नसणाऱ्यांना भोसरीतील वसतीगृहात राहण्यासह जेवण्याची सोय

हिंदुस्थान लिव्हर कंपनीतर्फे 'सीएसआर'मधून महापालिकेला एक लाख साबन, लिक्विडचा पुरवठा

 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भिवंडीतील हिंदुस्थान लिव्हर कंपनीतर्फे ‘सीएसआर’मधून पिंपरी महापालिकेला एक लाख सहा हजार साबन, सहा हजार लिटर डोमेक्स डिसइन्फेक्टंट लिक्विड देण्यात आल्याची माहिती सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिली. तसेच ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या ज्या नागरिकांना शहरात राहण्याची तसेच जेवण्याची व्यवस्था नाही, अशा नागरिकांची भोसरी येथील आदिवासी आणि मागासवर्गींय मुलांच्या वसतीगृहामध्ये 275 बेडची सोय करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमाधून उपाययोजना सुरू आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये 15 आयसोलेशन तर, भोसरी येथील रुग्णालयात 10 आयसोलेशन आयसीयू वार्ड तातडीने निर्माण करण्यात येत आहेत. तसेच जिजामाता रुग्णालयात 100 आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातली सात खासगी रुग्णालयामध्ये आयसोलेशन आयसीयू वॉर्ड तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे ढाके यांनी सांगितले.

‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या व्यक्तींच्या रहिवासी जागेची तसेच आजूबाजूचा परिसर 24 मार्च पासून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने 40 पंप कार्यान्वीत केले आहे. ‘होम क्वारंटाईन’ केलेल्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही ढाके यांनी दिला आहे. ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या ज्या नागरिकांना शहरात राहण्याची, जेवण्याची व्यवस्था नाही, अशा नागरिकांची भोसरी येथील आदिवासी आणि मागासवर्गींय मुलांच्या वसतीगृहामध्ये सोय करण्यात आली आहे.

या वसतीगृहामध्ये 275 बेडची सोय करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’ केले आहे. मात्र, त्यांच्या राहण्याची तसेच जेवनाची सोय नसल्यास त्या नागरिकांनी या वसतीगृहात रहावे, असे अवाहन करण्यात आले आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी 8888006666 या सारथी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहनही ढाके यांनी केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पूकारून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पिंपरी-चिंचवडकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याने ढाके यांनी शहरवासीयांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.