Pimpri : महापालिकेत, शाळा, रुग्णालयांमध्ये प्लास्टिक, प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर झाल्यास विभागप्रमुखांवर दंडात्मक कारवाई

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा इशारा

1 मे 2020 पर्यंत महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त करण्याचा पर्यावरण मंत्र्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह शाळा, दवाखाने, रुग्णालयांमध्ये, महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ नये. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर न करता ग्लास अथवा धातूपासून निर्मित बाटल्यांचा वापर करण्यात यावा. प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची विभागप्रमुखांनी जबाबदारी घ्यावी. प्लास्टिकचा वापर आढळल्यास विभागप्रमुखांवर दंडात्मक कारवाईचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र सरकारने 23 मार्च 2018 पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (दि.4) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्लास्टिक बंदीचा आढावा घेतला. 1 मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. प्लास्टिक अविघटनशील असल्यामुळे राज्य सरकारने प्लास्टीकचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर 23 मार्च 2018 रोजीच्या अधिसूचनेद्वारे बंदी घातली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यालय, सर्व क्षेत्रीय कार्यालये, करसंकलन विभागीय कार्यालये, सर्व शाळा, दवाखाने, रुग्णालये याशिवाय महापालिकेच्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनात प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ नये. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर न करता ग्लास अथवा धातूपासून निर्मित बाटल्यांचा वापर करण्यात यावा. प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची विभागप्रमुखांनी जबाबदारी घ्यावी. विभागामध्ये कोठेही प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास विभागप्रमुखांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.