Pimpri : सेंट्रल मॉल समोर पादचारी मार्ग करा; सहाय्यक पोलीस आयुक्त जाधव यांच्या वाहतूक विभागाला सूचना

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने बहुतांश ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. यात काही ठिकाणी पादचारी मार्गावरून देखील वाहतूक होत आहे. त्यामुळे पादचारी रस्त्यावरून चालतात. यासाठी सेंट्रल मॉल, अहिल्याबाई होळकर चौक यांसारख्या ठिकाणी पादचारी मार्ग तयार करण्याच्या सूचना वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांनी दिल्या.

मेट्रोचे काम सुरु असलेल्या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी महामेट्रो, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभाग यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे आणि त्यावरील उपाय यावर चर्चा करण्यात आली. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्तांनी महामेट्रोच्या अधिका-यांसोबत सेंट्रल मॉल, अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कासारवाडी, फुगेवाडी आदी ठिकाणी जाऊन पाहणी केली.

पिंपरी येथील सेंट्रल मॉल ते अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत एक ते दीड मीटर अंतरावर कर्ब स्टोन लावून पादचारी मार्ग सुरक्षित करावा. यामुळे या ठिकाणी होणारी अवैध पार्किंग रोखण्यासाठी मदत होईल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अहिल्यादेवी होळकर चौकातील सिग्नल सायकल मध्ये बदल करावा. संत मदर तेरेसा उड्डाणपूल ते पुणे या मार्गावर सर्वात जास्त वेळ ग्रीन सिग्नल ठेवावा. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही. या सूचना पिंपरी वाहतूक विभागाला दिल्या. तसेच जुना पुणे-मुंबई महामार्गालगत असणा-या गॅरेज आणि जुने वाहन विक्री दुकानदारांना रस्त्यावर वाहने न लावण्याबाबत नोटीस देण्यासही सांगण्यात आले आहे.

महामेट्रोकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बॅरीगेट, वाहतूक नियंत्रक फलक, वाहतुकीच्या सूचना देणारे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, लाल दिवे आदी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच फुगेवाडी ते सेंट्रल मॉल या दरम्यान एकूण 30 ट्राफिक मार्शल नियुक्त केले आहेत. हे ट्राफिक मार्शल 24 तास या मार्गावर कार्यरत ठेवण्यात आले असून ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत देखील करीत आहेत. जलद कृती दल मेट्रो मार्गालगतच्या मार्गावर बंद पडलेल्या, अपघातग्रस्त वाहनांना तात्काळ मदत पोहोचवत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.