Pimpri: आता पुणे, पिंपरीत चालणार ‘दादागिरी’, पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडे

एमपीसी न्यूज – पाच वर्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. तसेच त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देखील आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या अजितदादांचे भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेतील कारभारावर विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे सत्ताधारी ‘दक्ष’ झाले आहेत. प्रशासनावर त्यांची पकड आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता अजितदादांची दादागिरी चालणार आहे. दरम्यान, 2004 ते 2014 दरम्यान सलग दहा वर्ष अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

पुणे महापालिकेत दहा वर्षे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. राज्यभरात पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा शहरावर एकछत्री अंमल होता. अजितदादांचे बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष प्रेम, जिव्हाळा होता. शहराचा उल्लेख करताना माझे पिंपरी-चिंचवड शहर असा उल्लेख ते नेहमी करतात. बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी शहराचा नियोजन बद्ध विकास केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची खडा न खडा माहिती त्यांना आहे. शहरातील प्रलंबित प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळे शहरवासियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील शास्तीकराचा, रिंगरोडचा प्रश्न सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे हे प्रश्न सुटतील अशी आशा शहरवासियांना आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. मागील तीन वर्षात भाजप आमदारांनी ‘हम करेसो कायदा’ याप्रमाणे कामकाज केले आहे. भाजपच्या या कारभाराला आयुक्त श्रावण हर्डीकर यांची देखील साथ लाभली. सनदी अधिकारी असूनही आयुक्त भाजप धार्जिणे असल्याचे आरोप राष्ट्रवादी नगरसेवकांनी केले आहेत. त्यामुळे आयुक्त अजितदादांच्या रडारवर असणार आहेत. आयुक्त हर्डीकर यांची लवकरच बदली होण्याची दाट शक्यता आहे.

आता महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अजितदादांच्या मर्जीतील येतील. दादांची प्रशासनावर उत्तम पकड आहे. अधिकारी दादांना घाबरून असतात. त्यांना प्रश्नांची संपूर्ण माहिती असते. त्यांच्यासमोर अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती घेऊनच जावे लागते. माहिती नसल्यास दादा त्यांच्या स्टाइलमध्ये अधिकाऱ्याचा समाचार घेतात. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये देखील धास्ती निर्माण झाली आहे. अजितदादा भल्या सकाळी कामकाजाला सुरुवात करतात. सकाळी-सकाळी विकासकामांची पाहणी करतात. बैठका घेतात. त्यामुळे अधिकारी आणि महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांची देखील धावपळ होणार आहे. त्याचबरोबर अजित पवार यांना पालकमंत्री गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा सरस कामगिरी करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.