Pimpri: तूर्तास पाणीकपात मागे नाही; आयुक्त हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण केवळ 44 टक्के भरले आहे. हा पाणीसाठा साडेचार महिनेच पुरेल एवढा आहे. त्यामुळे तुर्तास पाणीकपात मागे घेतली जाणार नसल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) सांगितले. तसेच एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने पाण्याच्या तक्रारी येत नसून पावसाचा अंदाज घेऊनच पाणीकपात मागे घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आजमितीला पवना धरणात 44 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

  • त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, गेल्या वर्षी पवना धरण ऑगस्ट महिन्यात भरले होते. त्यानंतर पाऊसाने दडी मारली. तर, परतीच्या पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे लवकरच धरणातून पाणी उचलावे लागले होते. महापालिका दिवसाला 470 एमएलडी पाणी उचलत होती. परिणामी, यंदा पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा सर्वांत कमी म्हणजेच 13 टक्यांवर आला होता. महापालिकेने 1 मार्च 2019 पासून विभागनिहाय एकदिवस पाणीपुरवठा बंद केला होता.

तरी, देखील पाण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामध्ये वाढ करत 6 मे पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने तक्रारी कमी झाल्या. पाणी जास्त दाबाने येऊ लागले. उंचावरील गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये पाणी पोहचू लागले. महापालिका दिवसाला 420 एमएलडीच पाणी उचलत असून 25 टक्के पाणीकपात करावी लागली.

  • आजमितीला पवना धरण केवळ 44 टक्के भरले आहे. समाधानकारक पाऊस धरण पाणलोट क्षेत्रात झाला नाही. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याची घाई केली जाणार नाही. ज्या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अशा भागात जास्त पाणी पुरवठा केला जाईल. परंतु, आत्ताच पाणीकपात मागे घेतली जाणार नाही. चार महिने नदीपात्रातूनच पाणी उचलतो. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच पाणीकपात मागे घेतली जाणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.