Pimpri: आता नॉन कोविड रुग्णांना मोबाइलद्वारे औषधोपचार मिळणार

Pimpri: Now non-covid patients will get medication through mobile pcmc smart sarthi telemedicne तीन महिने कालावधीसाठी येणा-या 29 लाख 50 हजार रूपयांची रक्कम आयडीबीआय बँकेमार्फत सीएसआर अंतर्गत प्राप्त झाली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना साथीव्यतिरिक्त अन्य आजारांवर शहरातील नागरिकांना आता मोबाइलद्वारे औषधोपचार देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ‘मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या अ‍ॅपद्वारे ही टेलिमेडिसीनची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांकरिता येणा-या 30 लाख रूपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यावर पालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

सद्यस्थितीत कोरोना साथीव्यतिरिक्त अन्य आजारांवर शहरातील नागरिकांना विशेषत: वृद्ध व लहान मुले यांना प्रत्यक्ष दवाखान्यात न जाता त्यांच्या आजाराबाबत दुरध्वनीद्वारे किंवा मोबाइलद्वारे माहिती दिल्यानंतर मोबाईलद्वारे औषधोपचार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ मोबाईल अ‍ॅप्लिकेशन’च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या अ‍ॅपद्वारे देण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या 13 जून रोजीच्या पत्राद्वारे पहिल्यांदा सात दिवसांकरिता कामकाज करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या अ‍ॅप्लिकेशनचा वापर हा आसाम, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक येथील शहरी आणि ग्रामिण भागांमध्ये कार्यान्वित असून त्याचा उपयोग विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी होत आहे.

या सेवेचा शहरातील नागरिकांना उपयोग होण्याच्या दृष्टीने ही सुविधा पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल अ‍ॅपशी इंटिग्रेट व कस्टमाईज करून आवश्यक तो करारनामा करण्यासंदर्भात पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

मेड ऑन गो यांचे अधिकृत वितरक रेवमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर्स हे आहेत. त्यानुसार त्यांना कामकाजाचे आदेश देण्यात येणार आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता टेलिमेडिसीनची सुविधा तीन महिने कालावधीसाठी कार्यान्वित ठेवण्यासाठी 29 लाख 50 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे.

टेलिमेडिसीन अ‍ॅप्लिकेशनद्वारे कन्सल्टींग करण्यासाठी महापालिकेने वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व सुविधेसह लॅपटॉप अथवा संगणक यंत्रणा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याबाबत प्रस्तावात नमूद केले आहे.

या प्रस्तावात करारनामा झाल्यानंतर इंटिग्रेशन व कस्टमायजेशनची रक्कम देण्याबाबत नमुद केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिना संपल्यानंतर कमीत कमी 50 हजार कन्सल्टेशन प्रमाणे 5 लाख 90 हजार रूपये दर महिना देण्यात येणार आहेत.

50 हजारच्या पुढे कन्सल्टंटचा आकडा गेल्यास वाढीव प्रति कन्सल्टेशनकरिता 10 रूपये अधिक जीएसटी अशी रक्कम द्यावी लागणार आहे.

तीन महिने कालावधीसाठी येणा-या 29 लाख 50 हजार रूपयांची रक्कम आयडीबीआय बँकेमार्फत सीएसआर अंतर्गत प्राप्त झाली आहे. त्यानुसार, रेवमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर्स यांच्याकडून निविदा न मागविता थेट पद्धतीने परंतु, करारनामा करून कामकाज करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.