Pimpri: साबण खरेदीत अधिकाऱ्यांची ‘फेसाळ’ कमाई, पालिकेचे लाखोंचे नुकसान

Pimpri: Officers' earnings in soap purchase, loss of lakhs to the municipality एकाच पुरवठाधारकाकडून वेगवेगळ्या किमतीमध्ये साबण खरेदी करण्याचे प्रयोजन काय? असे चौकशी समितीने भांडार विभागाकडे विचारणा करत खुलासा मागविला.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेने झोपडपट्टीधारकांना निकृष्ट दर्जाचे मास्क पुरविल्याचे आणि चौकशीसाठी भांडार विभाग काही संस्थांच्या मास्कचे नमुनेच देवू शकले नसल्याचे उघड झाल्यानंतर आता या विभागाचा आणखी एक पराक्रम उघडकीस आला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी देण्यात आलेला लाईफबॉय साबण एकाच पुरवठादारांकडून तीनवेळा वेगवेगळ्या किमतीला खरेदी केल्याचे समोर आले आहे.

पुरवठादाराला 4 लाख 88 हजार 674 रुपये ‘जास्त’ दिल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे साबण खरेदीत देखील अधिका-यांनी हात धुवून घेतल्याचे दिसत आहे.

भांडार विभागाचे प्रमुख झाल्यापासून वादग्रस्त ठरलेले मंगेश चितळे यांच्या गलथान कारभारावर शिक्कामोर्तब झाल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शहरातील झोपडीधारकांसाठी महापालिकेने 125 गॅम वजनाचे एक लाख 60 हजार लाईफबॉय साबण पुरविल्याचा दावा केला आहे. जिंदल ट्रेडिंग कंपनीकडून तीनवेळा साबण खरेदी केली. 18 एप्रिल रोजी 20.17 पैशांनी एक लाख 21 हजार 212 साबणांची तर, 22 एप्रिल रोजी 18.17 पैशांनी 38 हजार 788 आणि 3 जून रोजी त्याच पुरवठादाराकडून 20.14 पैशांनी एक लाख 25 हजारांच्या साबणांची खरेदी केली.

एकाच पुरवठाधारकाकडून वेगवेगळ्या किमतीमध्ये साबण खरेदी करण्याचे प्रयोजन काय? असे चौकशी समितीने भांडार विभागाकडे विचारणा करत खुलासा मागविला.

पुरवठादाराने लाईफबॉय साबणाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किंमतीनुसार वाढ व घट होत असतात. त्यानुसार किमती निर्धारित केल्या जातात, असा खुलासा केल्याचे भांडार विभागाने समितीला सांगितले. वितरकांनी केवळ माल पुरवठा केला असून किंमत कंपनीने ठरविल्याचे निदर्शनास येते असे अहवालात म्हटले आहे.

तीन सदस्यीय समितीचा निष्कर्ष सांगतो!
तीनवेळा झालेला पुरवठा तीन वेगवेगळ्या किमतींना झाला आहे. त्यामुळे 18.17 पैसे ही किंमत विचारात घेता. 20.17 आणि 20.14 पैसे या दराने पुरवठ्यामुळे 4 लाख 88 हजार 674 रुपये पुरवठादाराला ‘अतिरिक्त’ अदा झाले आहेत.

याबाबत समितीने 30 जून रोजी कंपनीकडे ई-मेलद्वारे विचारणा केली असता कारवाई सुरु असल्याचे 2 जुलै रोजी कंपनीने मेलद्वारे कळविले. ही बाब विचारात घेता कोविड परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेस अशा विभिन्न दराने पुरवठा झाल्याची बाब तांत्रिकदृष्ट्या समर्थनीय ठरु शकेलही.

तथापि, नावाजलेल्या व जवळ-जवळ मक्तेदारी असणा-या उत्पादक कंपनीकडे पाठपुरावा करुन अशी रक्कम एक विशेष बाब म्हणून कंपनीने परत द्यावी. यासाठी भांडार विभागाकडून कार्यावाही व्हावी. जर हे शक्य न झाल्यास ही बाब पालिकेच्या सीएसआर कक्षाच्या निदर्शनास आणून द्यावी.

त्याच्या माध्यमातून या कंपनीकडून भरघोस मदत घेण्याची कार्यवाही करावी अशी शिफारस समितीने केली आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या खरेदीत भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी मोठ्या प्रमाणात ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्याचे बोलले जात आहे.

स्पष्टीकरण पुन्हा सादर करणार

साबण खरेदीचे स्पष्टीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पुन्हा एकदा सादर करणार असल्याचे भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.