Pimpri: आषाढी एकादशी दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून “हरित वारी…आपल्या दारी” उपक्रम

On Ashadi Ekadashi day, "Harit Wari ... at your door" activities by NCP

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसमुळे श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व राज्यातून अनेक मानाच्या पालख्या आणि मोजक्याच भाविकांना आषाढी एकादशी दिवशी पंढरीची वारी करता येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक व भाविकांनी आपल्या दारात, परिसरात व प्रभागात एक वृक्ष लावा आणि त्यात पांडूरंग पाहावा. आषाढी एकादशीच्या दिवशी 1 जुलै रोजी “हरित वारी… आपल्या दारी” उपक्रमांद्वारे विठ्ठलरूपी वृक्षलागवड करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले आहे.

दरवर्षी लाखो भाविक आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पायीवारी स्थगित करण्यात आली आहे.

यंदा कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची आषाढी वारी चुकली असली तरी या वारीची आठवण म्हणून “हरित वारी… आपल्या दारी” उपक्रमांद्वारे 1001 तुळशी झाडांचे वाटप व शहरात विविध ठिकाणी 10 हजार झाडे लावण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

सर्व नागरिकांसह आजी-माजी नगरसेवक, महिला व युवक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या उपक्रमाद्वारे “विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड” करुन ‘श्री विठ्ठल दर्शना’सह आषाढी एकादशी साजरी करावी, असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.