Pimpri : मेडिकल दुकानाचा बनावट शिक्का वापरून एजन्सीमधून औषधे घेणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज – मेडिकल दुकानाचा बनावट शिक्का तयार केला. त्याद्वारे दोघेजण औषधांच्या एजन्सीमधून औषधे आणण्यासाठी गेले. औषधे मागणाऱ्यांचा संशय आल्याने एजन्सी चालकाने प्रकरणाची शहानिशा केली असता बनावट शिक्के आणि दस्तऐवज वापरून फसवणूक करत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी चारच्या सुमारास कुंदन एजन्सी, चिंचवड स्टेशन येथे घडली.

वाईद अब्दुल चौधरी (वय 19, रा. अजमेरा, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मोहम्मद भाई (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चेलाराम आधारामजी चौधरी (वय 40, रा. गवळी वाडा, चिंचवड स्टेशन) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भगवती मेडिकल या नावाने बनावट शिक्का तयार केला. त्याचा वापर करून nitroson 10 mg. tossex syrup असे चिठ्ठीवर लिहून आरोपी चिंचवड येथील कुंदन एजन्सीत गेले. चिठ्ठीचा संशय आल्याने एजन्सीचे मालक अजय दरडा यांनी भगवती मेडिकलचे मालक चेलाराम यांना फोन करून औषधांबाबत विचारले. चेलाराम यांनी कोणालाही औषधे आणण्यासाठी पाठवले नसल्याचे अजय यांच्या लक्षात आले.

अजय यांनी चेलाराम यांना कुंदन एजन्सी येथे बोलावून घेतले आणि चिठ्ठीवर असलेल्या शिक्क्याविषयी खातरजमा केली. त्यावेळी वापरलेला शिक्का आपला नसल्याचे चेलाराम यांनी सांगितले. यावरून शिक्क्याच्या गैरवापर केल्याबाबत गुन्हा नोंद करून वाईद याला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा एक साथीदार फरार आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.