Pimpri: ‘कोरोना’ विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कोटीचे सुरक्षा कवच’ : गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधात लढताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-याबाबत काही दुर्घटना घडल्यास एक कोटी आणि त्याच्या वारसास महापालिकेत नोकरी देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णयाला आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या गटनेत्यांनी मान्यता दिल्याचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या आहेत. हे कर्मचारी वेळेचे कोणतेही बंधन न पाळता जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांना एक कोटी सुरक्षा कवच लागू करावा, कर्मचा-याच्या वारसाला महापालिकेत नोकरी द्यावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने केली होती. त्यानंतर गटनेत्यांची आज बैठक झाली. त्यामध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

 

”कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांसह नेमणूक केलेल्या कर्मचा-यांचा कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व संशयीत रुग्णाशी थेट संपर्क येत असतो. त्याचप्रमाणे सर्व्हेसाठी नेमणूक केलेल्या कर्मचा-यांचा देखील थेट संपर्क येवू शकतो. त्यामुळे एखाद्या कर्मचा-याला कोरोनाचा संसर्ग होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या कर्मचा-यांना योग्य असे सुरक्षा कवच व प्रशासनाचा आधार असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नेमणूका केलेल्या कर्मचा-यांना विमा कवच लागू केले आहे. या कर्मचा-यांबाबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना महापालिकेमार्फत सुरक्षा कवच म्हणून दुर्घटने पश्चात एक कोटी रुपये आणि त्यांच्या वारसास महापालिका सेवेत नोकरी देण्यात येणार आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करुन त्यास संमती मिळाली आहे”.    नामदेव ढाके – सभागृह नेते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1