Pimpri : व्यवसायाच्या बहाण्याने एकाची सव्वा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – भागीदारीत व्यवसाय करत असताना व्यवसायातून आलेल्या नफ्याचा हिशोब न देता बँकेची बनावट कागदपत्रे दाखवून एकाची एक कोटी 19 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 मे 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 या कालावधीत खराळवाडी पिंपरी येथे घडला.

सुनील शिवराम शिंदे (वय 51, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय नारायण पवार, सुवर्णा संजय पवार (दोघे रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगणमत करून फिर्यादी शिंदे यांच्यासोबत हॉटेल आणि बसचा व्यवसाय करण्याचा करारनामा केला. या व्यवसायासाठी शिंदे यांच्याकडून आरटीजीएस आणि रोख स्वरूपात पैसे घेतले. ते पैसे व्यवसायामध्ये न गुंतवता इतरत्र गुंतवले. व्यवसायातून आलेल्या नफ्याचा हिशोब शिंदे यांना दिला नाही. तसेच शिंदे यांच्या मोबाईलवर नफा झाल्याबाबत खोटा मेसेज पाठवला. बँक खात्याचे बनावट स्टेटमेंट दाखवले.

अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादी शिंदे यांची एक कोटी 19 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. शिंदे यांनी गुंतवलेल्या रकमेची आणि नफ्याची मागणी केली असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.