Pimpri : सफाई कामगाराच्या कुटुंबियांना दहा लाखांचे अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज – काळेवाडीत गटार साफसफाई करताना मॅनहोलमध्ये उतरलेल्या ठेकेदाराकडील एका सफाई कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना दहा लाखाचे अर्थसहाय करण्यात आले. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी याबाबतची माहिती दिली.

अ‍ॅड. सागर चरण म्हणाले, भरत डावखर हे महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराकडे सफाई कामगार म्हणून काम करत होते. 13 सप्टेंबर 2017 रोजी मॅनहोलमध्ये काम करत असताना त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला.

  • या घटनेनंतर डावखर कुटुंबियांनी संपर्क साधला. हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध व सफाई कामगारांचे पुनर्वसन कायदा – 2013 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 2014 च्या निर्देशानुसार कार्यरत कामगार कामाच्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्याचा आधार घेत ’प्रधान नियोक्ता’ या नात्याने महापालिका आयुक्तांना नोटीस बजाविण्यात आली. तसेच, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार करण्यात आली.

त्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ.स्वराज विद्वान यांनी महापालिका आयुक्तांची सुनावणी घेत मृत्युमुखी कामगाराच्या कुटुंबियांना 10 लाखांचे अर्थसहाय, विमा, भविष्यनिर्वाह निधीसह देय रक्कम देण्याचे आदेश दिले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची दखल घेत सफाई ठेकेदाराला 10 लाख रुपयांचे अर्थसहाय देण्यास सांगितले. त्यानुसार, संबंधित ठेकेदाराने धनादेश डावखर कुटुंबियांकडे सुपूर्द केला. यावेळी तक्रार निवारण समिती सदस्य अनिल चावरे, रामपाल सौदा, दमयंती अहिरे, योगेश चावरे आदी उपस्थित होते.

  • यावेळी अ‍ॅड. सागर चरण म्हणाले, महापालिका इतिहासात पहिल्यांदाच कंत्राटी सफाई कामागराला अर्थसहाय मिळवून देण्यात यश आले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगामुळे हे शक्य झाले आहे. भोसरीमध्ये नालेसफाई करताना विजेच्या धक्क्याने दगावलेल्या बाळू सोनवणे या सफाई कामगाराच्या कुटुंबियांना १० लाखांची नुकसानभरपाई देण्याची नोटीस पिंपरी – चिंचवड महापालिकेने नुकतीच बजाविली आहे.

केंद्र सरकारने हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध व सफाई कामगारांचे पुनर्वसन कायदा – 2013 लागू केला आहे. त्यामुळे 1993 पासून कामावर असताना मृत्युमुखी पडलेल्या सफाई कामगारांना नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात काम करताना मृत्युमुखी पडलेल्या कामगारांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही सागर चरण यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.