Pimpri: आणखी एका कोरोनाबाधिताचा 14 दिवसांनंतरचा रिपोर्ट ‘निगेटीव्ह’, 30 संशयितही ‘निगेटीव्ह’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्यानंतर आता आणखी  एका रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले आहेत. तर, संशयित म्हणून दाखल झालेल्या 30 जणांचेही रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आहेत. शहरातील कोरोनाचे रुग्ण ठणठणीत होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश येताना दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण पॉझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर लागोपाठ असे 12 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले आहेत. आता आणखी एका रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले आहेत. या रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने आज आणखी एकदा तपासणीसाठी ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात येणार आहे.  या तपासणीत देखील रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर हा रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ असल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्याला  घरी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 30 संशयितांचे रिपोर्ट देखील ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, कोरोनाबाधित असलेल्या 9 जणांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मागील सहा दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही.  शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.