Pimpri: तरुणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; आजपर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण

सक्रिय रुग्णांची संख्या 43; 18 रुग्ण कोरोनामुक्त; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडगाव शेरी भागातील राहणा-या आणि पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या एका 27 वर्षीय तरुणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 43 वर पोहचली आहे. आजपर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने सोमवारी (दि.20) 45 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री उशिरा  आले आहेत.  त्यात पुण्यातील पण महापालिकेच्या वायसीएममध्ये दाखल असलेल्या तरुणाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील तेरा दिवसांत 42 नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. 17 एप्रिल रोजी दोन आणि 18 एप्रिल रोजी सात, 19 एप्रिल रोजी एकाचे  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. तर, 20 एप्रिल रोजी एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने  मागील तेरा दिवसात तब्बल 42  नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 63 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 43 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 38 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, सहा सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील आणि एका रुग्णावर परभणी येथील रुग्णालयात अशा सात जणांवर शहराबाहेर उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा आणि सोमवारी (दि.20) निगडी भागातील रहिवाशी पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.