Pimpri : ‘मला कायदा शिकवू नका, साहेब! हे प्रकरण लय जड जाईल’; पोलीस चौकीत अरेरावी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – खोलीचे भाडे देण्यावरून झालेले भांडण पिंपरी चौकीत आले. त्यांना समजावून सांगत असताना एकाने मोठ्या तावाने ‘मला कायदा शिकवू नका, मी व्यवसायाने वकील आहे’ असे पोलीस कर्मचाऱ्याशी उद्धटपणे बोलून ‘साहेब, हे प्रकरण लय जड जाईल’ अशी पोलीस अधिकाऱ्याला धमकी देत पोलीस चौकीतच राडा घातला. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) दुपारी घडली.

अतुल मारुती कांबळे (वय 35, रा. खराळवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राजू पांढरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल याने अंजु रमेश तिजारे या महिलेला त्याची खोली भाड्याने दिली होती. अतुल आणि तिजारे यांच्यामध्ये खोलीचे भाडे देण्यावरून वाद झाला. हे प्रकरण गुरुवारी दुपारी पिंपरी पोलीस चौकीत आले. पोलिसांनी अंजु तिजारे आणि त्यांचा मुलगा आयुष तिजारे यांच्याकडे चौकशी केली. चौकशीत दोघांनी सांगितले की, त्यांनी आरोपी अतुल याला एका महिन्याचे भाडे 18 हजार रुपये आणि कमिशन 12 हजार रुपये असे एकूण 30 हजार रुपये दिले आहेत.

आरोपी अतुल हा तिजारे यांच्याशी ऍग्रिमेंट करण्याचे टाळत आहे. तसेच फोनवर धमकी देत असल्याचे तिजारे यांनी सांगितले. त्यावेळी आरोपी अतुल त्याच्या साथीदाराला म्हणाला की, ‘आपण आता कसलेही पैसे मागायचे नाहीत. मी उद्या पिंपरी कोर्टात चेक बाऊन्सची केस टाकून यांच्यावर 420 (फसवणूक) चा गुन्हा दाखल करतो.’ असे म्हणून आरोपी तिजारे यांना धमकावत होता.

त्यावेळी फिर्यादी पोलीस हवालदार पांढरे आरोपीला म्हणाले, ‘पोलीस चौकीत कसल्याही प्रकारची अरेरावी करून धमकी देऊ नका.’ त्यावर ‘तुम्ही पोलीस आहात, तुम्ही मला कायदा शिकवू नका. मी व्यवसायाने वकील आहे. तुमच्यापेक्षा कायद्याचे ज्ञान मला जास्त आहे.’ अशी पोलीस हवालदार पांढरे यांना आरोपीने धमकी दिली. आता तुम्ही त्या महिलेचे म्हणणे ऐका असे म्हणून चौकीच्या बाहेर जाऊन पुन्हा चौकीत आला आणि पोलीस हवालदार पांढरे यांच्याकडे बोट दाखवून चुटकी वाजवून ‘तुम्ही या दोघांना काही उलट सुलट सल्ले दिले ना, तुम्हाला बघून घेईन.’ अशी धमकी दिली.

फिर्यादी यांनी आरोपीला पिंपरी पोलीस चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम यांच्यासमोर नेले असता आरोपीने निकम यांनाही ‘तुम्हाला हे प्रकरण लय जड जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना धक्काबुक्की करत ‘तुला लय माज आला आहे का’, असे म्हणून चौकीत आरडा ओरडा केला. त्यानंतर आरोपीने एकाला फोन करून पिंपरी चौकीत कार्यकर्ते घेऊन येण्यास सांगितले. यापुढे पिंपरी चौकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी कसे काम करतात ते बघतो म्हणत ‘मी मीडिया बोलावली आहे. आता बघाच काय करतो ते’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.