Pimpri : डोक्यात वार करत गळा चिरून तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 22) पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली.

हितेश मुलचंदानी (वय 23, रा. डी ब्लॉक, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार इसमांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशच्या मित्रांचे पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाले. किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याच्या मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत कुणाल हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसवले.

चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.