Pimpri : खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू ; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – विनाकारण थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने चॉपरने वार करुन तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.15) पिंपरीतील डिलक्स चौकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

मंजीत मोतीलाल प्रसाद (वय 22, रा. काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धर्मेश शामकांत पाटील (रा. मिलिंदनगर, पिंपरी), यशवंत उर्फ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 20, रा. मिलिंदनगर, पिंपरी), स्वप्नील संजय कांबळे (वय 25, रा. आदर्शनगर) तिघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहन संभाजी देवकते (वय 25, रा. चंदननगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

मंजीत हा विमाननगर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. फिर्यादी देवकाते हे शुक्रवारी आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून आयटीतील अधिका-यांना सोडविण्यासाठी चालले होते. दुपारी सव्वाचारच्या सुमारास ते पिंपरीतील डिलक्स चौक परिसरात आले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी गाडी थांबवण्याचा इशारा केला. त्यामुळे देवकाते यांनी टेम्पो थांबविला.

टेम्पोत बसलेल्या मंजीत प्रसाद याने ‘क्या हो गया’ असे म्हणताच दुचाकीवरील एका आरोपीने मंजित याच्या तोंडावर हाताने मारहाण केली. थोबाडीत का मारली ? याचा जाब विचारण्यासाठी मंजीत खाली उतरला. ‘क्यु मारा’ असे म्हणताच आरोपींनी मंजित याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर मंजित याच्या दोन्ही खांद्यावर चॉपरने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मंजित याच्यावर थेरगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गु्न्हे) रंगनाथ उंडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.