Pimpri: विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांचे ऑनलाईन आंदोलन

Online movement of rickshaw pullers for various demands

घरासमोर उभे राहून मांडणार मागण्या; ‘माझी रिक्षा माझा परिवार’ अभियान

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय बंद होऊन 100 दिवस झाले. वारंवार मागण्यांसाठी लक्ष वेधून सरकार मागण्यांबाबत सकारात्मक नसल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालकांनी आज, बुधवारपासून अभिनव पद्धतीने ऑनलाईन आंदोलन सुरु केले आहे. त्यासाठी ‘माझी रिक्षा माझा परिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. रिक्षाचालक घरासमोर रिक्षा उभी करून परिवारासोबत फोटो काढून या अभियानात सहभागी होत आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रिक्षा व्यवसाय बंद आहे. काही मोजक्याच रिक्षा रस्त्यावर आहेत. त्यांना देखील पुरेसे प्रवासी उपलब्ध होत नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

त्यामुळे इंधनाचे पैसेही दिवसभराच्या कमाईतून वसूल होत नाहीत. त्यामुळे रिक्षा चालविण्यासाठी खिशातून पैसे टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून त्यांची उपासमार होत आहे. यातून नैराश्य आल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडसह राज्यात आतापर्यंत आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

आत्महत्याग्रस्त रिक्षाचालकांच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी, लॉकडाऊन काळात दरमहा 10 हजार रुपये याप्रमाणे रिक्षाचालकांना आर्थिक मदत मिळावी, रिक्षा व्यवसायावरील सर्व निर्बंध उठविण्यात यावेत, रिक्षाचालकांचे कर्ज माफ करावे, रिक्षावरील कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणा-या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. त्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले आहे.

रिक्षाचालकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत या संघटनेतर्फे माझी रिक्षा माझा परिवार अभियान राबविण्यात येत आहे. रिक्षाचालक त्यांच्या घरासमोर मागण्यांचे फलक हातात घेऊन उभे राहणार आहेत.

त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून सरकारपर्यंत मागण्या पोहचविण्यात येणार आहेत. या अभियानाला पिंपरी येथून आज बुधवारी सुरूवात झाली. पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, बळीराम काकडे, साहेबराव काजले आदी या वेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले, रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रिक्षाचालक आत्महत्या करीत आहेत. तरीदेखील सरकार गप्प आहे. त्यामुळे हे ऑनलाइन आंदोलन सुरू केले.

रिक्षाचालक घरासमोर रिक्षा उभी करून परिवारासोबत फोटो काढून या अभियानात सहभागी होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.