Pimpri: …तरच राष्ट्रवादीच्या ‘पुरस्कृत’ उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा -सचिन साठे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी, चिंचवड, भोसरीमध्ये नक्की कोणता उमेदवार दिला आहे याबाबत मित्र पक्ष म्हणून आम्ही अनभिज्ञ आहोत. कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीने चिंचवड आणि भोसरीमध्ये काँग्रेसच्या परस्पर विधानसभेसाठी ‘पुरस्कृत’ उमेदवार जाहीर करू नये. त्यासाठी कॉंग्रेसला गृहित धरु नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज (रविवारी) जाहीर केली.

पत्रकार परिषदेला माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, सुदाम ढोरे, अनूसचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरकडे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, मयूर जैसवाल, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगुटमल, मकरध्वज यादव, सुंदर कांबळे, शितल कोतवाल आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी धर्मनिरपेक्ष पक्षांविरूद्ध लढण्याची आहे. शहरात काँग्रेसची विचारधारा मानणारा मोठा वर्ग असल्याचे सांगत साठे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला. आता देखील आघाडीचा धर्म पाळावा, असा कॉंग्रेसच्या वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे. परंतू, ‘पुरस्कृत’ उमेदवाराला मदत करा, असा आदेश नाही. शहरात कोणताही उमेदवार पुरस्कृत करण्या अगोदर राष्ट्रवादीने काँग्रेस नेतृत्वाशी संवाद साधायला हवा. त्यासाठी काँग्रेसला गृहित धरु नये, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.