Pimpri : दहावीचे केवळ तीनच विद्यार्थी यंदा लाखाचे मानकरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस देण्यात येत असून यंदा 90 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेले केवळ तीनच विद्यार्थी लाखाचे मानकरी ठरले आहेत. तर, 85 टक्यांहून अधिक गुण मिळविलेले 24 विद्यार्थ्यी 50 हजारांचे आणि 80 टक्क्यांच्या पुढे गुण प्राप्त केलेले 39 विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. दरम्यान, यंदा यंदा दहावीचा निकाल 61.91 टक्के लागला असून तो 23 टक्यांनी घटला आहे. परिणामी, गतवर्षी 18 विद्यार्थी लाखाचे मानकरी ठरले होते. यंदा केवळ तीनच विद्यार्थी लाखाचे मानकरी ठरले आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने महापालिकेने 2013 पासून बक्षीस योजना सुरु केली आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे 80 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला जातो. 90 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला 1 लाख, 85 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या 50 हजार रुपये आणि 80 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपये देऊन गौरविण्यात येते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 शाळा आहेत. यापैकी पिंपळेसौदागरच्या अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील निवृत्ती लक्ष्मण साखरे याला 93.80 टक्के मिळाले. त्याच शाळेतील प्रथमेश शहाजी जाधव याने 93.20 टक्के गुण मिळविले. तर, थेरगाव माध्यमिक विद्यालयाचा राज उदय गिरी याने 93.40 टक्के गुण मिळवित तिघांनी लखपती होण्याचा मान मिळविला. या तिघांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

85 टक्यांहून अधिक गुण मिळविलेल्या 24 विद्यार्थ्यांना 50 हजारांचे बक्षीस मिळणार आहे. त्यामध्ये भोसरी माध्यमिक विद्यालयातील 5, केशवनगर माध्यमिक विद्यालयातून 5, पिंपळे सौदागरचे 2, थेरगाव विद्यालयातून 2, क्रीडा प्रबोधिनी 2, आकुर्डी 2, भोसरी, लांडवाडे विद्यालयातून 1, पिंपळेगुरवमधून 1 आणि वाकडमधून 1 असे 24 विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

तर, 80 टक्क्यांच्या पुढे गुण प्राप्त केलेले 39 विद्यार्थी 25 हजार रुपयांसाठी पात्र ठरले आहेत. पिंपळेसौदागरमधून 13, थेरगाव 5, रुपीनगर 3, क्रीडा प्रबोधिनीतून 2, श्रमिकनगर 2, आकुर्डी, केशवगनर, वाकड, पिंपळेगुरव, कासारवाडी, फुगेवाडी, भोसरी, संत तुकारामनगर येथील शाळांमधून प्रत्येकी एक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.