Pimpri: विरोधक उरले नाही म्हणता, मग मोदी-शहा यांच्या सभा का घेता? – अजित पवार

एमपीसी न्यूज – भाजप हा बोलघेवड्यांचा पक्ष आहे. परदेशातून काळा पैसा आणू, शेतक-यांची कर्ज माफ करू अशी केवळ घोषणाबाजी भाजपने केली. मात्र, प्रत्यक्षात जीएसटी व नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. लोकांना हे सारे दिसते आहे. म्हणूनच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधक उरले नाही असे म्हणता मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा का घेता? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला केला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी आकुर्डीतील खंडोबा मंदिर सभागृह येथे आज (सोमवारी) आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर,  काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे,  विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, अपर्णा डोके, माजी उपमहापौर दिनकर दातीर पाटील, रेखा गावडे, राजू मिसाळ, नगरसेवक शाम लांडे, जावेद शेख, नगरसेविका माई काटे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राजाराम कापसे, शंकरराव पांढारकर, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

आत्ताची निवडणूक ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. त्यामुळे 370 चा मुद्दा सांगू नका महाराष्ट्रात काय केले ते सांगा. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतक-यांना 50 हजार कोटी वाटले असे मुख्यमंत्री सांगतात. पण ते खरे असते तर शेतक-यांनी आत्महत्या केल्या असत्या का?, मागील पाच वर्षात राज्यात एक तरी नवीन उद्योग आला का?   असा सवाल करत पवार म्हणाले, मंत्रीमंडळातील 22 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तरीही मुख्यमंत्री त्यांना क्लिनचिट देतात. एकनाथ खडसे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता यांना तिकिट का दिले नाही? असा सवालही त्यांनी केला.

नोटबंदी व जीएसटीमुळे औद्योगिक मंदीचे सावट आहे मात्र, सरकार काही करायला तयार नाही. टेल्को, महिंद्रा, पारले, ऑटोमोबाईल इंडस्ट्रिज, आयटी कंपन्यांची काय अवस्था आहे? विकासदर का घटला? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहनही पवार यांनी  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like