Pimpri : मुख्यमंत्र्यांच्या शास्तीकर माफीच्या घोषणेचे विरोधकांकडून उद्यापासून ‘काउंट डाऊन’

महापालिका, मिळकतकर कार्यालयांवर फलक लावून दिवस मोजणार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 9) शहरातील अनधिकृत बांधकामांची शास्ती येत्या पंधरा दिवसात माफ करु…! या दिलेल्या आश्वासनाचे विरोधक उद्या (शनिवार)पासून ‘काउंट डाऊन’ करणार आहेत. महापालिका इमारत, मिळकतकर कार्यालयांवर आश्वासनाचा फलक लावून दिवस मोजले जाणार आहेत. 15 दिवस पुर्ण होईपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील भुमिका घेण्यात येणार असल्याचे विरोधकांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत सांगितले.

दत्ता साने म्हणाले, ”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आल्यावर केवळ आश्‍वासनाने देतात. प्रत्यक्षात तो निर्णय होत नाही. शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, पवना बंद जलवाहिनी याबाबत त्यांनी सातत्याने आश्वासने दिली. परंतु, निर्णय झाला नाही. भाजपचे आमदार निर्णय झाल्याचे फलक लावून गोरगरिब जनतेची फसवणूक करतात. आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी 15 दिवसात शास्तीची धास्ती घालविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी उद्यापासून महापालिका मुख्यालय, कर संकलन कार्यालयांवर आश्वासनाचा फलक लावून दिवस मोजले जाणार आहेत. 15 दिवस पुर्ण होईपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील भुमिका घेण्यात येणार असल्याचे” त्यांनी सांगितले.

”मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफीचे आश्‍वासन दिले असतानाही महापालिकेकडून नागरिकांना जप्तीपूर्वीच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेने त्वरित नागरिकांना जप्तीच्या नोटीसा देणे थांबवावे. नागरिकांनी देखील शास्तीकर भरु नये असे आवाहन”, साने यांनी केले.

”मुख्यमंत्र्यांनी चिंचवड येथील एका सभेत शास्तीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या-त्या महापालिकांना देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, अद्याप काहीही झाले नाही. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराबाबत 15 दिवसात निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. अशा आश्‍वासनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे. मुख्यमंत्री वारंवार आश्‍वासने देतात. मात्र, त्याची पूर्तता होत नाही. त्यांनाच त्यांच्या आश्‍वासनांचा विसर पडत आहे”, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले.

महापालिकेत आज (शुक्रवारी) झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.