Pimpri: ‘विरोधी पक्षनेत्याला उद्‌घाटनासाठी डावलले; पालिकेचे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते’

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप

एमपीसी न्यूज – चिखली प्रभाग क्रमांक एक मधील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्‌घाटनाला स्थानिक नगरसेवक आणि शहराचा विरोधी पक्षनेता असूनही आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही. यामध्ये ‘प्रोटोकॉल’चे उल्लंघन केले असून महापालिकेचे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्रमांकमध्ये गुरुवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमांना स्थानिक नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेता असूनही संबंधित विभागाच्या अधिका-यांनी आपल्याला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. निमंत्रण न देताच उद्‌घाटन करण्यात आले. मी स्थानिक नगरसेवक असून विरोधी पक्षनेता या पदावर कार्यरत आहे. तरी, देखील आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही. विरोधी पक्षनेत्यांनाच जर अशी वागणूक मिळत असेल. तर, विरोधी पक्षातील इतर नगरसेवकांना कशी वागणूक दिली जात असेल ? महापालिकेत शिष्टाचार (प्रोटोकॉल) नावाची गोष्ट राहिली नाही, असे साने म्हणाले.

हा प्रकार अतिशय गंभीर असून महापालिकेचे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कामे सुचवायची, त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावयाची अन्‌ श्रेय मात्र भाजपने घ्यायचे असा सध्या प्रकार चालू आहे. प्रशासन सुध्दा सत्ताधारी पक्षाच्या ‘हो ला हो’ मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर अन्याय करत असल्याचा आरोपही साने यांनी केला.

भूमिपूजन आणि उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांना टाळण्यात आल्याबाबत सखोल चौकशी करावी. दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते साने यांनी केली आहे. तसेच यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची ताकीद अधिकाऱ्यांना द्यावी, असेही साने यांनी म्हटले आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.