Pimpri : महापालिकेतील सत्ताधारी अन् विरोधकांचे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’!

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सेटिंग ?

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार सुरु आहे. विरोधक केवळ दिखाव्यापुरता विरोध करत आहेत. विरोध केल्याची नौटंकी करत असून विरोधक म्हणजे ‘पत्रकवीर’ झाले आहेत. विरोधक आक्रमक भूमिका घेऊ लागल्यास सत्ताधारी उघडपणे सभागृहात आम्हाला बोलायला लावू नका, अशी धमकी विरोधकांना देत आहेत. सत्ताधा-यांची ही धमकी म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमधील ‘सेंटिग’ उघड होत आहे. यातूनच विरोधक केवळ नौटंकीपुरता विरोध करताना दिसून येतात. त्यामुळे महापालिकेत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. हा कारभार योग्य नाही. शहरातील जनता सूज्ञ असून सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका त्यांच्या लक्षात येत असून आगामी निवडणुकीत जनता आपली कमाल नक्कीच दाखवेल.

पारदर्शक कारभारासाठी शहरवासियांनी पिंपरी महापालिकेत मोठ्या अपेक्षेने सत्तांतर घडवून आणले. भाजपला एकहाती सत्ता सोपविली. भाजपच्या सत्तेला दोन वर्ष होत आली. तरीदेखील त्यांना कामाची चुणूक दाखविता आली नाही. सत्ताधा-यांना पारदर्शक कारभाराचा नव्हे तर ‘संशयास्पद’ कारभाराचा सूर सापडला आहे. त्या कारभारात विरोधकांना सामावून घेण्याची ‘कला’ देखील सत्ताधा-यांना अवगत झाली आहे. स्वत:ला आक्रमक समजणारे विरोधक देखील सत्ताधा-यांचे जाळ्यात ‘अलगद’ जाऊन बसले आहेत. त्यामुळे अधिकारी, ठेकेदारांचे फावत चालले आहे. परिणामी, करदात्यांना कोणी वालीच राहिला नाही.

लोकशाहीत विरोधकांची भूमिका सत्ताधा-यांच्या चुकीच्या कामांना प्रखर विरोध करणे, चुकीची कामे हाणून पाडणे, भ्रष्टाचारावर आवज उठविणे अपेक्षित आहे. परंतु, इंथ तर विरोधकच सत्ताधा-यांना ‘मॅनेज’ झाले आहेत. सत्ताधा-यांसोबत परदेश दौरे करुन त्यांच्यासमवेत ‘सेटिंग’ करण्यात दंग झाले आहेत. विरोधी पक्षात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक विरोधक म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत. या तिन्ही पक्षांनी मिळून दोन वर्षाच्या काळात एकही चुकीचा विषय हाणून पाडला नाही. त्याविरोधात आवाज उठवित न्यायालयात धाव घेतली नाही. केवळ पत्रकबाजी करुन आमचाही विरोध असल्याची दाखवित नौटंकी केली जाते.

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अधिकारी, ठेकेदार हे महापालिका लुटत असल्याचा आरोप करत आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन सभात्याग करतात. जाहीरपणे आयुक्तांचा निषेध त्यांच्याकडून केला जातो. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आक्रमक होत असताना विरोधक मात्र मिठाची गुळणी घेऊन शांत बसल्याचे दिसून येतात. विरोधकांचा विरोध का मावळला? असा सवाल शहरातील सूज्ञ नागरिक करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील साटेलोटे समोर आले. सत्ताधारी आणि विरोधक लुटुपुटीची लढाई करत असल्याचे दिसून आले. पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा महापालिका शाळेत वर्गीकरण करण्याच्या विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील साटेलोटे समोर आले आहे. वर्गीकरणाचा विषय मंजूर केल्यानंतर विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेत तकलादू विरोध सुरु केला. या प्रस्तावाला विरोध करणारे शिक्षण समितीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे विरोधकांचा तुटपुंजा विरोध उघड झाला.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सत्ताधा-यांसोबत परदेश दौरे केल्यानंतर त्यांचा आक्रमकपणा कमी झाला आहे. सत्ताधा-यांच्या विरोधात ते आवाज उठविताना दिसत नाहीत. केवळ पत्रकाबाजी करत तुटपुंजा विरोध करताना दिसून येतात. आक्रमक भूमिका घेताच महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार यांनी साने यांना उद्देशून ‘आम्हाला सगळे काढायला लावू नका’ अशा उघड धमकी सभागृहात दिली. त्यामुळे त्यांच्यातील ‘सेंटिग’ लक्षात येत आहे. साने यांचा विरोध मावळल्याने स्वपक्षीय नगरसेवक देखील त्यांना साथ देताना दिसत नाहीत. ‘पार्टी मिटिंग’ला देखील नगरसेवक येत नाहीत. वास्तविक, राष्ट्रवादीकडे अनुभवी नगरसेवकांची फौज आहे. चार माजी महापौर, तीन माजी विरोधी पक्षनेते, दोन माजी स्थायी समिती अध्यक्ष अशी टीम आहे. त्यामुळे ते आक्रमकपणे मुद्दे मांडू शकतात. परंतु तेही शांत राहत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नऊ नगरसेवकांना सत्ताधा-यांच्या नाकीनऊ आणा असा आदेश दिला होता. परंतु नऊ नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. शिवसेनेची सभागृहातील अवस्था तर केवीलवाणी आहे. नगरसेवकांना श्वास घेता येईना, अशी परिस्थिती आहे. गटनेते राहुल कलाटे प्रत्येक विषयावर बोलतात. परंतु, त्याला अभ्यासाची जोड देऊन त्यांनी प्रश्न विचारण्याची गरज आहे. सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकदाही आंदोलन केले नाही. केवळ विरोधकांसोबत असल्याचा सूर आवळला जातो. तर, मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या सचिन चिखले यांना कोणतीही भूमिका नाही. सत्ताधा-यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा बाजूने बोलण्यातच ते धन्यता मानताना दिसून येतात.

सभागृहातील कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांना गांभीर्य दिसून येत नाही. एकही नगरसेवक अभ्यासपूर्वक आक्रमकपणे विषय मांडताना दिसून येत नाही. नगरसेवक चेष्टामस्करी करण्यात दंग असतात. त्यामुळे त्यांना निवडून दिलेल्या जनतेचे काही देणेघेणे आहे की नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगरसेवक अधिका-यांना ‘सॉफ्ट’ टार्गेट करतात. अनेक नगरसेवक अधिका-यांचा एकेरी उल्लेख करताना दिसून येतात. ‘विरोधी पक्षातील नगरसेवकांचा विरोध मावळला आहे. एकही नगरसेवक अभ्यासपूर्वक बोलत नाही. चुकीच्या कामाविरोधात न्यायालयात जात नाही’, असे शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे सभागृहात बोलताना म्हणाले. विरोधी पक्षातील नगरसेवकच विरोध मावळल्याचे मान्य करत आहेत.

आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. आचारसंहितेच्या काळात जनमत प्रभावीत होईल अशा कामांना मान्यता देता येत नाही. त्यामुळे त्याच्या अगोदरच सत्ताधा-यांना लोकोपयोगी कामे करावी लागणार आहेत. तर, विरोधकांना आक्रमक, मुद्देसूद आणि पुराव्यांच्या आधारे आरोप करून सत्ताधा-यांना चांगले निर्णय घेण्यास भाग पाडावे लागणार आहे. अन्यथा निवडणुकीत जनता आपली कमाल दाखवेल.

…..महापौरसाहेब हे वागणे बरे नव्हे!

महापौर राहुल जाधव सभागृहाचे कामकाज चुकीच्या पद्धतीने चालवित आहेत. विरोधकांना बोलून देत नाहीत. त्यांच्या बोलण्यात उर्मटपणा दिसून येतो. विषय रेटून नेतात. एकाचवेळी अनेक विषय मंजूर केल्याचे जाहीर करतात. विषयावर सांगोपांग चर्चा होऊ देत नाहीत. चर्चा न केल्यामुळे ‘संशय’ वाढतो. तसेच महापौर नगरसेवकांचे प्रश्न देखील स्वीकारत नाहीत. त्यामुळे स्वपक्षीय नगरसेवकांमध्ये देखील त्यांच्याबाबत नाराजी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.