Pimpri: जनता संपर्क अधिकाऱ्याच्या चौकशीचे आयुक्तांचे आदेश; कारवाई ‘होईलच’

Orders of the Commissioner of Inquiry of the Public Relations Officer; Action will be taken

एमपीसी न्यूज – जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी महिलेची लेखी तक्रार आली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून पुरावे गोळा करुन चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार कारवाई होईलच, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. तसेच गायकवाड यांच्या ‘एटीट्यूड’च्या दोनवेळा तक्रारी आल्याचेही त्यांनी सांगितले. तक्रारीच्या अनुषंगाने विशाखा समितीनेही चौकशी सुरु केली आहे. त्यानुसार लवकरच पुढील कारवाई करणार असल्याचे समितीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना शिंदे यांनी स्पष्ट केले.

मानसिक त्रास देऊन आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यामुळे गायकवाड यांना महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते. ते प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गायकवाड यांना चार महिन्यांपूर्वी पुन्हा महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे.

निलंबनानंतर रुजू झाल्यानंतरही गायकवाड यांच्या वर्तनात सुधारणा झालेली दिसून येत नाही. पहिल्या दिवसांपासून ते वादात सापडले आहेत. अवघ्या काही महिन्यात गायकवाड यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार आली आहे.

किरण गायकवाड वैयक्तिकरित्या आपली जाणीवपूर्वक छळवणूक करत असून विविध मार्गाने मानसिक त्रास देत असल्याचे त्यांच्या कार्यालयातील ‘त्या’ महिला कर्मचाऱ्याने तक्रार अर्जात म्हटले आहे.

ते सातत्याने अपमान करतात. एकेरी उल्लेख करतात, अर्वाच्च भाषा वापरतात, नियमबाह्य्य कामे सांगतात, मी सांगेन तसे न वागल्यास कारवाई करेन, अशी वारंवार धमकी देतात.

कार्यालयीन कामाव्यतिरिक्त “व्हॉट्सअॅप” ला संदेश पाठवत राहतात. त्यांचा नंबर ब्लॉक केल्यानंतर त्यांचा त्रास अधिक वाढला आहे. गायकवाड यांच्याकडून आपल्याला प्रचंड त्रास होत आहे”, असा मजकूर तरुणीच्या तक्रार अर्जात नमूद आहे.

याप्रकरणी भाजप नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. महिला कर्मचा-यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. गायकवाड यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”जनता संपर्क अधिका-यासंदर्भात त्याच विभागातील महिलेची तक्रार आली आहे. त्यानुसार चौकशीचे निर्देश दिले आहेत. पुरावे गोळा करुन चौकशी करण्यात येईल. त्यानुसार कारवाई होईलच. गायकवाड यांच्या ‘एटीट्यूड’च्या दोनवेळा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत”.

महापालिकेतील महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती)च्या अध्यक्षा ज्योत्स्ना शिंदे म्हणाले, ”तक्रार समितीकडे आली असून चौकशी सुरु आहे. समितीची बैठक झाल्यानंतर लवकरच पुढील कारवाई करणार आहोत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.