Pimpri : ‘कोरोना’चा उद्रेक; फॉरेन रिटर्न, नको रे बाबा !

एमपीसी न्यूज  (प्रमोद यादव) – परदेशातून भारतात प्रवेश केलेल्या जीवघेण्या कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतात आज घडीला कोरोना बाधितांची संख्या 250च्यावर जाऊन पोहोचली आहे, तर यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. हा विषाणू परदेश दौऱ्यावरून भारतात आलेल्या तसेच व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि पर्यटनासाठी परदेशात गेलेल्या लोकांनी हा विषाणू त्यांच्या सोबत मायदेशात आणला. परदेशातून आलेले भारतीय नागरिक हा विषाणू भारतात घेऊन आले. त्यामुळे ‘फॉरेन रिटर्न’ असलेल्या नागरिकांकडे कोरोना संशयित म्हणून बघण्याची वृत्ती बळावत आहे.

त्यातून फॉरेन रिटर्न म्हटले की प्रत्येकाच्या मनात आता प्रचंड भीती निर्माण होत असल्याचे पहायला मिळत आहे. फॉरेनला जाऊन शिक्षण घेण्याची व तिथेच सेटल होण्याची क्रेज होती, पण कोरोनामुळे हेच लोक आपण परदेशातून आलो असल्याचे लपण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे फॉरेनपेक्षा आपला गावच बरा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रोजगार आणि शिक्षणासाठी शहराकडे धाव घेणाऱ्या तरुण वर्गाची आपल्याकडे लक्षणीय संख्या आहे. मुंबई, पुणे, बंगळुरूसारख्या शहरात देशातून येणारे सुशिक्षितांचे लोंढे मोठे आहेत. त्याचबरोबर उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेऊन रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. आखाती देशांमध्ये नोकरी सहज मिळते आणि पैसाही बक्कळ मिळतो.

त्यामुळे खेड्यामधील तरुण वर्ग रोजगारासाठी आखाती देशांत जाऊ लागला. परदेशात स्थायिक झालेलले मूळचे भारतीय कोरोनामुळे परदेशातून भारतात आल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने आखाती देशांतून विशेषतः दुबईवरून किंवा त्या मार्गे आलेल्या भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे.

‘नॉन रेसिडंट इंडियन’ या संकेतस्थळावरील माहितीनुसार संयुक्त अरब अमिराती या देशात त्यांच्या लोकसंख्येच्या 27.1 % लोक हे भारतीय आहेत, तसेच कुवेतमध्ये 17.5 %, तर चीननंतर कोरोनाचा जास्त धुमाकूळ असलेल्या इटलीमध्ये जवळपास दीड लाख भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. सगळ्या देशातील भारतीय नागरिकांची आकडेवारी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोरोना सगळ्याच देशात दहशत निर्माण करीत आहे आणि या विषाणूची लागण आपल्याला होऊ नये म्हणून परदेशी स्थायिक झालेले नागरिक मायदेशी परत येत आहेत, नेमके हेच लोक कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. सगळेच पॉझिटीव्ह नसले तरी जे परदेशी नागरिक कोरोना निगेटीव्ह आहेत त्यांना 14 दिवस ‘होम क्वारंटाईन’ सक्तीचे आहे. तरीही आपल्याला कसलाही त्रास नाही, असे सांगून हे नागरिक खुशाल घराबाहेर वावरत असतात.

ताजे उदाहरण द्यायचे झाले तर प्रसिद्ध बॉलीवूड गायिका कनिका कपूर काही दिवसांपूर्वी लंडनहुन भारतात परतली होती, पण तिने आपला परदेश दौरा लपून ठेवला आणि खुशाल सार्वजनिक डिनर पार्टीमध्ये सहभागी झाली. या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह खासदार दुष्यन्त सिंग सहभागी झाले होते.

याच दुष्यन्त सिंग यांनी दोन दिवस संसदेमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे कोरोना आता संसदेच्या उंबरठयावर पोहोचला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कनिकासारख्या एका बेजबाबदार नागरिकांमुळे शंभर नागरिकांचा जीव धोक्यात गेला आहे.

गड्या आपला गावच बरा !

शहरात कोरोना झपाट्याने पसरत असल्यामुळे येथे आपण सुरक्षित नाही, असा समज नागरिकांचा झाला आहे. त्यामुळे शहरातील लोंढेच्या लोंढे मिळेल त्या गाडीने पुन्हा गावाकडे दाखल होत आहेत. सोशल मीडियावर शेवटी गावच जिंकला, अशा आशयाचे मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे फॉरेन पेक्षा गड्या आपला गावचं बरा, अशी भावना आता शहरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.