Pimpri: खबरदारीसाठी महापालिका आहरण अधिका-यांच्या स्वाक्षरीचे नमुने संकलित करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची बिले मंजूर करण्याचे अधिकार दिलेल्या आहरण किंवा वितरण अधिका-यांच्या स्वाक्षरीचे नमुने महापालिकेच्या लेखा विभागाने मागविले आहेत. बिलांची तपासणी करताना येणारी अडचण लक्षात घेता. कोणतीही समस्या उद्‌भवू नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून या स्वाक्ष-यांचे नमुने संकलित केले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विविध विभाग आहेत. प्रत्येक विभागातील खर्चाची बिले मंजूर करण्यासाठी एका अधिका-याला अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिका-यांना आहरण किंवा वितरण अधिकारी असे संबोधले जाते. या सर्व विभागांकडून विकासकामांची बिले अंतिम मंजुरीसाठी लेखा विभागाकडे पाठविली जातात. ही बिले सादर करताना कामाचा प्रस्ताव, आदेश , दाखले. फॉर्म नं. 22 या सर्व बाबींचे सोपस्कर पार पाडावे लागते. बिलासोबत ही सर्व कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे.

दरम्यान, विविध विभागांकडून उपलब्ध होणा-या या सर्व सोपस्कारांच्या कापदपत्रांवर आहरण अधिकारी म्हणून वेगवेगळ्या स्वाक्ष-या असल्याची बाब महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनास आली आहे. अंतिम बिल मंजूर करताना ही बाब अडचणीची ठरत आहे. या सर्व प्रक्रियेत एकसूत्रीपणा आणण्यासाठी आहरण अधिका-याची नियुक्‍ती केली असतानादेखील त्यामध्ये वेगळेपणा जाणवत आहे. त्यामुळे बिले मंजूर करण्यासाठी अधिकार प्रदान केलेल्या विभागातील अधिका-यांच्या स्वाक्षरीचे नमुने लेखा विभागाने मागविले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.