Pimpri: शहरात तब्बल एक हजार अनधिकृत गतिरोधक!; केवळ 110 गतिरोधक उभारले पोलीस परवानगीने

जागृत नागरिक महासंघाचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल एक हजार गतिरोधक अनधिकृत टाकण्यात आले आहेत. तर, केवळ 110 गतिरोधक पोलीस परवानगीने टाकण्यात आले आहेत. अनेक गतिरोधक इंडिएन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) मानांकनानुसार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जागृत नागरिक महासंघाने केलेल्या सर्वेक्षणातून शहरातील अनधिकृत गतिरोधकाचे वास्तव समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी अनावश्यक असे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. गतिरोधक हे कायद्याला धरून नाहीत. गतिरोधक अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाच्या आजारांनी नागरिक त्रस्त होत असून पाठ, मान, मणक्याचे आजार गंभीर होत आहेत. जागृत नागरिक महासंघाने शहरातील अनधिकृत गतिरोधकाचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये शहरात सुमारे एक हजार अनधिकृत गतिरोधक असल्याचे समोर आले आहे. आयआरसी मानांकनानुसार गतिरोधक केले नसल्याचे दिसून आल्याचे महासंघाने म्हटले आहे.

महासंघाने महापालिकेकडे शहरातील गतिरोधकाबाबत माहिती मागविली होती. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वाकड भागात वाहतूक विभागाची परवानगी घेऊन 24, पिंपळेनिलखमध्ये 42 आणि पिंपळेसौदागरमध्ये 1 असे 67 गतिरोधक टाकले आहेत. आयआरसी मानांकनानुसार 67 तर आयआरसी मानांकन नसलेले तब्बल 124 गतिरोधक टाकण्यात आले आहेत.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकूण 444 गतिरोधक आहेत. त्यामध्ये पोलिसांची परवानगी घेऊन 14 गतिरोधक टाकले आहेत. तर, आयआरसी मानांकनानुसार 59 तर आयआरसी मानांकनाचे उल्लंघन केलेले तब्बल 385 गतिरोधक आहेत. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आयआरसी मानांकनानुसार 40 तर, आयआरसी मानांकनानाचे उल्लंघन केलेले 76 गतिरोधक आहेत. एकाही गतिरोधकासाठी पोलिसांची परवानगी घेतलेली नाही.

पोलिसांच्या परवानगीने शहरात केवळ 110 गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगवी वाहतूक विभागात पाच, हिंजवडी 44, निगडी 21, दिघी-आळंदी एक, तळवडे एक, भोसरी 11, चिंचवड 21, पिंपरी सात असे एकूण 110 गतिरोधक पोलीस परवानगीने टाकण्यात आले आहेत. शहरातील उर्वरित गतिरोधक अनधिकृत असल्याचे महासंघाने म्हटले आहे.

याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष नितीन यादव म्हणाले, शहारातील काही भागातील गतिरोधकांचे सर्वेक्षण केले आहे. अनेक ठिकाणी 500 मीटरमध्ये दहा-दहा गतिरोधक टाकले आहेत. शहरातील केवळ 110 गतिरोधक पोलीस परवानगीने टाकले आहेत. तर, सुमारे एक हजार गतिरोधक अनधिकृत आहेत. आयआरसी मानांकनानुसार गतिरोधक टाकले नाहीत. पोलीस परवानगी न घेता गतिरोधक टाकल्याने पोलिसांनी महापालिकेवर कारवाई करणे अपेक्षित होते. गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. माहिती अधिकारात पत्र दिल्यावर कारवाई चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

गतिरोधकामुळे पाटीचे, मणक्याचे आजार वाढले आहेत. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आवश्यक आहे ती ठिकाणी गतिरोधक टाकण्यास आमचा आक्षेप नाही. आयआरसी मानांकनानुसार गतिरोधक टाकण्यात यावेत. परंतु, आयआरसी मानांकनानुसार आणि सर्वच ठिकाणी पोलीस परवानगीने गतिरोधक टाकता येत नसल्याचे उत्तर महापालिकेचे अधिकारी देत आहेत. परवानगी न घेता टाकलेल्या गतिरोधकामुळे अपघात झाल्यास, कोणाचे निधन झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील?, गतिरोधकमुळे वाहने नियंत्रणा आली नसल्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे, असेही यादव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.