Pimpri : पँथर्स रिपब्लिकन पार्टीची राज्यस्तरीय बैठक उत्साहात

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याचा विचार ; 10 फेब्रुवारी रोजी मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यस्तरीय बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षाशी म्हणजेच काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आघाडी न झाल्यास राज्यात स्वतंत्र उमेदवार उभे करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

पँथर्स रिपब्लिकन पार्टीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजीमंत्री गंगाधर गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला कार्याध्यक्षा सूर्यकांता गाडे, संघटक प्रा. निवृत्ती आरू, एन.एम. पवळे, पुणे जिल्हाध्यक्ष गौतम डोळस, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सिद्राम मोरे, सुरेश म्हस्के, अ‍ॅड.दीपक खापरे, आनंद गायकवाड, अशोक वानखेडे, सोमचंद्र दाभाडे, अरुण वानखेडे, ए.व्ही. वर्धे आदी उपस्थित होते.

  • या बैठकीत समविचारी पक्ष म्हणजेच काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत पदाधिकार्‍यांनी गंगाधर गाडे यांच्याकडे सूचना केल्या. आघाडी न झाल्यास राज्यातील पुणे, बारामती, सोलापूर, शिर्डी, औरंगाबाद, भिवंडी, ठाणे, मावळ, शिरुर, अमरावती, जालना, नांदेड, बीड, बुलडाणा, जळगाव या मतदारसंघात निवडणूक लढविण्यात येणार आहे. संभाव्य उमेदवारांची नावे पार्टीतर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कोअर कमिटी सदस्यांचीही निवड करण्यात आली.

येत्या 10 फेब्रुवारी पार्टीचा ठाणे, शिर्डी आणि सोलापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतच्या नियोजनाची जबाबदारी पदाधिकार्‍यांवर देण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक गौतम डोळस यांनी, तर सिद्राम मोरे यांनी आभार मानले.

  • कलाकारांसाठी ‘कलाकार सुरक्षा संघ’ स्थापन
    सर्वच पातळीवरील कलाकारांना आरोग्य चांगले राहावे, यासाठी संघातर्फे सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल. कलाकारांना येणार्‍या अडचणी, समस्यांचे निराकरणही संघातर्फे करण्यात येणार आहे. या संघाची जबाबदारी गौतम डोळस आणि सिद्धार्थ मोहिते यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.