Pimpri : राजस्थानच्या कोटा शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची पालकांची मागणी

एमपीसी न्यूज – राजस्थानमधील कोटा शहरात ‘नेट’ परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी देशभरातील लाखो विद्यार्थी जात असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अचानक लॉकडाऊन लागू केल्यामुळे हे सर्वच विद्यार्थी कोटा शहरात एक महिन्यांपासून अडकून पडले आहेत. पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, त्यामुळे सरकारने तातडीने पाऊले उचलून या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणावे, अशी मागणी विद्यार्थी व पालक करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा फटका महाराष्ट्रातील सुमारे 5000 विद्यार्थ्यांना बसला असून, हे विद्यार्थी निट, जेईई, एम्स, एनडीए तसेच मेडिकल व इंजिनीअरींग प्रवेश परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी शिक्षणासाठी प्रसिध्द असलेल्या कोटा शहरात एक महिन्यांपासून अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना वास्तव्यासाठी खासगी वसतिगृह किंवा खोलीत राहवे लागत आहे. लाॅकडाऊनच्या काळात जेवण उपलब्ध होत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे.

दिवसेंदिवस बाहेरची परिस्थिती चिंताजनक होत असल्यामुळे मुलांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. त्यामुळे गोवा, उत्तरप्रदेश, बंगाल, आसाम, छत्तीसगढ़ या राज्यांनी विशेष बस पाठवून आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांना परत आणले. महाराष्ट्र सरकारने सुद्धा असे पाऊल उचलून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणावे, अशी मागणी पालक करत आहेत.

अन्य राज्ये आपल्या मुलांना घरी पोहचवण्यासाठी व्यवस्था करत आहेत. तशी व्यवस्था महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्र्यांनी करावी. कोटा शहरात मुलांचे हाल होत आहेत. मुले फोनवरून रडत असल्याने आमचा जिव तुटतोय, त्यांना किती दिवस धिर द्यायचा ? – स्वानंद कुंभार, पालक, लोणावळा

लाॅकडाऊनमुळे बाहेर सर्व बंद आहे. वसतिगृहात स्वच्छता राखली जात नाही व जेवणाची गैरसोय होत आहे. अभ्यासक्रम सुद्धा उरकला आहे. बाहेरची परिस्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे सरकारने उपाययोजना करून घरी सोडण्यासाठी प्रयत्न करावेत – शुभम ओसवाल, विद्यार्थी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.