Pimpri: पार्किंगचे दर बदलले, …’असे’ आहेत नवीन वाढीव दर !

महापालिकेच्या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही

एमपीसी न्यूज – पार्किंग पॉलिसी राबविण्यासाठी एकही निविदा प्राप्त झाली नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने मंजूर केलेल्या ‘पार्किंग पॉलिसी’ मध्ये सुधारणा केली आहे. पार्किंगचे दर बदलले असून ‘ए’, ‘बी’, ‘सी’ झोनमध्ये प्रति तासाकरिता दुचाकी पाच रुपये, रिक्षा पाच रुपये, चारचाकी दहा रुपये, टेम्पो, मिनीट्रक 15 रुपये, मिनी बस 25 रुपये, खासगी बस 100 रुपये आणि ट्रक, ट्रेलरसाठी 100 रुपये असे दर निश्चित केले आहेत. या सुधारित वाढीवदराच्या उपसूचनेला स्थायी समितीने बुधवारी (दि.5) मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे. पार्किंग पॉलिसीच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पार्किंग अॅप तयार करुन पार्किंगचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

शहराची निवासी व फिरती लोकसंख्या तब्बल 27 लाखांपर्यंत पोहचली आहे. सन 2017 च्या आकडेवारीवरून शहरात तब्बल 15 लाख 68 हजार 607 वाहने असल्याची नोंद आहे. आतापर्यंत ही संख्या 18 लाखांच्या वर पोहचली आहे. त्यामुळे शहरातील प्रशस्त रस्ते ही पार्किंगसाठी अपुरे पडत आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेच्या बीआरटीएस विभागाने पार्किंग पॉलिसी निश्‍चित केली होती. त्यास स्थायी समितीने 9 जून 2018 ला तर, महापालिका सर्वसाधारण सभेने 22 जून 2018 मंजुरी दिली होती.

या धोरणानुसार शहरात ज्या ठिकाणी दिवसभर 80 ते 100 टक्के पार्किंगची आवश्यकता आहे, असे ठिकाण झोन ‘अ’ (उच्च पार्किंग), ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्के आहे, असे ठिकाण झोन ‘ब’ (मध्यम पार्किंग), ज्या ठिकाणी 40 ते 60 टक्के पार्किंगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन ‘क’ (कमी पार्किंग) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन ‘ड’ (कमीत कमी पार्किंग) म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानुसार अधिक वर्दळीच्या भागांत वाहने लावण्यासाठी तासानुसार शुल्क, निवासी भागांत 24 तास वाहने लावण्यासाठी वार्षिक शुल्क घेतले जाणार होते. दुचाकीस तासाला 2 रूपये, रिक्षाला तासाला 6 रूपये, चारचाकी, टेम्पोला 10, मीनी बसला 15, ट्रॅकला 33 आणि खासगी बसला तासाला 39 रूपये शुल्क आकारले जाणार होते.

महापालिकेने शहरातील पार्किंग पॉलिसीनुसार शुल्क आकारण्याबाबत निविदा प्रसिद्ध केली होती. निविदेचा कालावधी तीन वेळा वाढविण्यात आला होता. तथापि, वाढविलेल्या कालावधीत देखील एकही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पार्किंगच्या दरात बदल केले आहेत. सुधारित दराला स्थायी समितीने मंजुरी दिली असून अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.