Pimpri : भाषणावरुन ‘ट्रोल’ होणारे पवार कुटुंबातील पार्थ पहिलीच व्यक्ती

एमपीसी न्यूज – राज्याच्या राजकारणातील मात्तबर राजकीय घराणे म्हणून पवार कुटुंबियाकडे पाहिले जाते. कुटुंबातील राजकारणात असलेल्या प्रत्येकाच्या भाषणाची शैली अभ्यासपूर्ण, आक्रमक राहिली आहे. परंतु, तिस-या पिढीतील मावळातून लोकसभेला उभे राहलेले पार्थ पवार पहिल्याच जाहीर सभेतील भाषणामुळे सोशल मीडियावर चांगलेच ‘ट्रोल’ झाले आहेत. त्यामुळे भाषणावरुन ‘ट्रोल’ होणारे पवार कुटुंबातील पार्थ पहिलेच व्यक्ती आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याभोवती फिरत आहे. पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाह देशाचे संरक्षण, कृषीमंत्रीपद देखील भूषविले. त्यांचे भाषण म्हणजे बोच-या शब्दात विरोधकांवर प्रहार असतात. अभ्यासपूर्ण भाषणे असतात. तर, दुस-या पिढीतील अजित पवार, सुप्रिया सुळे यांची देखील भाषणाची वेगळी शैली आहे. गावरान शैलीत अजित पवार भाषण करतात. सुप्रिया सुळे यांची अभ्यासपूर्ण भाषणे असतात.

तर, तिस-या पिढीतील रोहित पवार देखील तितक्याच आक्रमकपणे सभांमधून पक्षाची भूमिका मांडत विरोधकांवर प्रहार करतात. त्यामुळे मावळचे उमेदवार असलेले पार्थ देखील चांगले भाषण करतील, असे अपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना होती. परंतु, तीन मिनिटांचे भाषण देखील पार्थ यांना वाचून दाखविता आले नाही. घरातून राजकीय बाळकडू मिळाले असतानाही त्यांना वाचून भाषण करता आले नाही. पार्थ पहिले भाषण करताना भांबावलेले दिसून आले. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. तसेच भाषणावरुन पार्थ सोशल मिडीयावर ‘ट्रोल’ होत आहेत. युतीच्या उमेदवाराला पार्थ यांचा भाषणाचे आयतेच कोलित मिळाले आहे.

दरम्यान, पार्थ ट्रोल झाल्यावर त्यांच्या पाठीशी नेते उभे राहिले आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे, काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पार्थ यांची पाठराखण केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.