Pimpri : अकेमी बिझनेस स्कुलमध्ये रंगला माजी विद्यार्थी मेळावा

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील अकेमी बिझनेस स्कुलमध्ये नुकताच माजी विद्यार्थी मेळावा पार पडला. यावेळी उत्सुकता, आनंद, आश्चर्य, कौतुक, मस्ती अशा संमिश्र भावना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा विभा बोके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अभिषेक बोके तसेच संस्थेचे संचालक प्रा. संजय धर्माधिकारी, डॉ. सचिन कुलकर्णी, प्रा. मृणाली सानेर, प्रा. राजश्री दिघे, माधवी देशपांडे आदींसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिषेक बोके यांनी ‘सध्याची शिक्षणपद्धती आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी तयारी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेच्या अध्यक्षा विभा बोके म्हणाल्या, शाळेने विद्यार्थ्यांना संस्काररुपी शिक्षण दिले आहे. त्यामुळेच हे विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात मोठ्या पदांवर दिसतात. उद्याचे नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षणव्यवस्था करीत असते.

महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी आपली मनोगत सादर केले. एकमेकांसोबत सेल्फी काढले, ग्रुप फोटो काढले, तसेच स्नेहभोजनाचा आस्वादही लुटला. या माजी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर मित्र मैत्रिणींच्या भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. विद्यालयीन जीवनातील गमती जमती सांगत अनेकांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. उत्सुकता, आनंद, आश्चर्य, कौतुक, मस्ती अशा संमिश्र भावना चेहर्‍यावर दिसत होत्या. या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप, फेसबुक व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा संकल्प केला. संघटनात्मक वृत्तीने समाज उन्नतीची कामे करावीत, असा आशावादही माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा. संजय धर्माधिकारी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील संस्थेच्या ध्येयधोरणाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मृणाली सानेर व प्रा. राजश्री दिघे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. संजय धर्माधिकारी यांनी, तर आभार माधवी देशपांडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.