Pimpri : वायसीएम रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

मागील तीन महिन्यात रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याच्या तीन घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या दुस-या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवारी) सकाळी सातच्या सुमारास घडली. वायसीएम रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून रुग्णांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या मागील तीन महिन्यात तीन घटना घडल्या आहेत.

शंकर पात्रे (वय 45) असे उडी मारलेल्या रुग्णाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पात्रे यांना दारूचे व्यसन होते. त्यावरील उपचारासाठी त्यांना शुक्रवारी (दि. 3) वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात भरती असताना ते वारंवार रुग्णालयाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्यावर तिस-या मजल्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी ते आपत्कालीन जिन्यातून दुस-या मजल्यावर आले. तिथून त्यांनी खाली उडी मारली. यामध्ये पात्रे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मागील तीन महिन्यात वायसीएम रुग्णालयात अशा प्रकारे रुग्णांनी इमारतीवरून उडी मारण्याचे तीन प्रकार घडले आहेत. 10 मे रोजी रुग्णालय परिसरात एका रुग्णाचा मृतदेह आढळला. तपासाअंती त्या रुग्णाने उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यानंतर 5 जून रोजी एका रुग्णाने दुस-या मजल्यावरून उडी मारली. सुदैवाने खाली कचराकुंडी असल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आज (सोमवारी) तिसरा प्रकार घडला. विशेष म्हणजे या सर्व रुग्णांना दारूचे व्यसन होते. त्यासाठी त्यांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.