Pavana Dam News : पवना धरणातून होणार 3450 क्यूसेस विसर्ग; नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणारे मावळ तालुक्यातील पवना धरण काठोकाठ भरले आहे. धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून आता 3 हजार 450 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण एक आठवड्यापूर्वी शंभर टक्के भरले. दरम्यान पाण्याचा येवा कमी असल्याने धरणातून केवळ विद्युत संचासाठी पाणी सोडण्यात येत होते. गेल्या आठवडा भरात मावळ परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मागील वर्षी 11 सप्टेंबरपर्यंत 1633 मिलिमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी 2343 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

शनिवारी (दि. 11) पवना धरण क्षेत्रात 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाण्याचा येवा वाढल्याने धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. आतापर्यंत पवना धरणातून वीजनिर्मिती संचाद्वारे 1350 क्यूसेसने विसर्ग करण्यात येत होता. आता धरणाच्या सांडव्यातून 2100 क्यूसेसने विसर्ग केला जाणार आहे. पवना नदीत एकूण 3450 क्यूसेसने विसर्ग होणार आहे.

त्यामुळे पवना नदीची पाण्याची पातळी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकांनी सर्तक राहून सर्व प्रकारची हानी टाळावी, असे पवना धरणाचे उपअभियंता यांनी सांगितले आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.