Pimpri : पवना, मुळशी जलाशय तुडुंब भरले; मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली

सांगवी भागातील 40 कुटुंबांचे स्थलांतर

एमपीसी न्यूज –  मुळशी आणि पवना ही दोन्ही धरणे  100 टक्के भरली आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर पावसाचा जोर देखील सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे पिंपरी, चिंचवड आणि सांगवी मध्ये पाणी शिरले असून या भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने 40 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

मुळशी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून शनिवारी रात्री दहा वाजता 28 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर अकरा वाजता पाण्याचा विसर्ग वाढवून 30 हजार तर दोन वाजता 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे मुळा नदीची पाण्याची पातळी सतत वाढत आहे. मुळा नदी औंध मार्गे सांगवी परिसरातून पुण्याच्या दिशेने वाहते. त्यामुळे मुळा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या परिसरात नदीचे पाणी शिरले आहे.

सांगवी आणि परिसरातील कस्पटे वस्ती, विशाल नगर, पिंपळे निलख, पंचशील नगर, आदर्श नगर, शितोळे नगर, ममता नगर, जयमाला नगर या भागात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. रविवारी पहाटे सांगवी मधील मधुबन सोसायटी क्रमांक 1 ते 10 नागरिकांच्या घरात पाणी घुसले. तसेच सांगवीतील मुळानगर परिसरात नदी पात्रालगत असलेल्या 50 झोपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले.

पवना धरण देखील पूर्णतः भरले असून धरणाचे सहाही दरवाजे तीन फुटांनी उचलण्यात आले आहेत. यातून 1 हजार 400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून सांडव्यातून 12 हजार 390 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पवना धरणातून एकूण 13 हजार 790 क्युसेक्स पाणी नदीमध्ये सोडण्यात आले आहे. पवना नदीच्या किनारी असलेल्या अग्रसेन नगर, पवनानगर या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आणि सांगवी परिसरातील बहुतांश भागात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, पवना आणि मुळशी धरणे भरली असल्याने नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. हे पाणी पिंपरी-चिंचवड आणि सांगवी परिसरात येण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये नद्यांचे पाणी घुसले आहे. रविवारी पहाटे सांगवी परिसरातील 40 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ठिकाणी सूचना देण्यात येत असून स्थलांतराचे देखील काम करण्यात येत आहे.

मुळानगर आणि मधुबन सोसायटी मध्ये पाणी शिरले. दरम्यान परिसरातील वेताळ नगर येथील एका गार्डनमध्ये सुरक्षारक्षकाचे कुटुंब पाण्यात अडकले होते. याबाबतची माहिती पिंपरी अग्निशमन विभागाला मिळाली. अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रविवारी पहाटे सुरक्षारक्षकाच्या कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. अग्निशमन विभागाने सांगवी परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला असून त्यांच्याद्वारे नागरिकांच्या मदतीचे काम करण्यात येत आहे.

विश्रांतवाडीमधील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी घुसले

विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीत सुमारे 40 घरात पावसाचे पाणी घुसले असून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी रात्रीपासून या भागात पाणी आल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मदतीसाठी अग्निशामन दल पोहचले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.