Pimpri: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प भाजपमुळेच रखडला – दत्ता साने

एमपीसी न्यूज – पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प सत्ताधारी भाजपमुळेच रखडला आहे. आमदारांचा केवळ महापालिकेच्या मलईवर डोळा आहे. त्यांना पाण्याचे गांभीर्य नाही. या जलवाहिनी प्रकल्पाचे राजकारण करुन भाजपने पिंपरी-चिंचवडकरांना चोवीस तास पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.

साने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना चोवीस तास मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा. याकरिता बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, महापालिकेसह राज्यात भाजपची सत्ता असूनही मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठविली नाही.

महापालिकेचा महत्वकांक्षी असलेला बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पाकडे भाजप पदाधिका-यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. एकीकडे जलवाहिनीचा प्रकल्प सामंजस्याने सोडवू म्हणायचे अन् दुसरीकडे मावळात जलवाहिनीचा प्रकल्प कदापिही होवू देणार नाही, अशी दुटप्पी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे.

या जलवाहिनी प्रकल्पाचे राजकारण करुन भाजपने शहरवासियांना चोवीस तास पाणी योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप साने यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.