Pimpri : पवना धरणात केवळ 13 टक्‍के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात केवळ 13.38 टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. 20 जुलै पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा असून आजपर्यंतचा सर्वांत कमी 13 टक्के पाणीसाठा यंदा धरणात राहिला आहे. दरम्यान, शहरवासियांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आजअखेर पवना धरणात 13.38 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी क्षमता 10 हजार दशलक्ष घनमीटर आहे. पाणी पातळी 1.75 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. महापालिकेने सुरवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले होते. त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्‍यता पाहता दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली आहे.

पवना धरण परिसरात 98 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला 290 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद आहे. त्या तुलनेत यंदा अत्यंत कमी पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.