Pimpri : ऑक्टोबर महिना संपला तरीही पवना धरण तुडुंब; जुलै 2020 पर्यंत पुरणार पाणीसाठा !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण ऑक्टोबर अखेरीसही तुडुंब भरले आहे. पहिल्यांदाच ऑक्टोबर अखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा असून जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मागीलवर्षी आजमितीला धरणात 88.50 टक्के पाणीसाठा होता. मागील वेळीपेक्षा यावेळी धरणात 11.50 टक्के पाणीसाठा अधिक आहे. यामुळे शहरवासियांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. दरम्यान, विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा नियमित केला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आजअखेर पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 88.50 टक्के पाणीसाठा होता. यावेळी धरणात 11.50 टक्के अधिक पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मागीलवर्षी पाणलोट क्षेत्रात 3367 मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. यावेळी चार हजार 20 मिली मीटर पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला आहे. मागीलवर्षीपेक्षा 700 मिली मीटर पाऊस यावेळी जास्त झाला आहे.

मागीलवर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे शहरवासियांना दिवाळीपासूनच पाणीकपातीला सामोरे जावे लागले होते. सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले होते. त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्‍यता असल्याने दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली होती. ही पाणीकपात 9 ऑगस्टपासून रद्द करत दररोज पाणीपुरवठा सुरु केला होता. परंतु, पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने पुन्हा 18 ऑगस्टपासून आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीकपात लागू केली आहे. धरणात 100 टक्के पाणीसाठा असूनही विभागनिहाय पाणीकपात कायम आहे.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल म्हणाले, “धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. पहिल्यांदाच ऑक्टोबरअखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरु राहिला. मागीलवर्षी ऑगस्ट अखेर पाऊस संपला होता. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला नाही. परतीचा पाऊस देखील पडला नव्हता. यावेळी ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालू राहिला. ऑक्टोबरच्या अगोदर पडणा-या पावसाचे पाणी धरणात साठवून ठेवता येत नाही”

पाणी साठवून ठेवण्याची मर्यादा 15 ऑगस्टपर्यंत ठरलेली असते. 15 ऑगस्टनंतर धरणात 100 टक्के पाणीसाठा केला जातो. 15 ऑगस्टनंतर झालेल्या पावसाचा उपयोग होत नाही. धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागतो असे सांगत गडवाल म्हणाले, “यावेळी 15 ऑगस्टनंतर 15 ऑक्टोबरपर्यंत पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या पाण्याचे साठवण करता आले. मागीलवर्षी पाणलोट क्षेत्रात 3367 मिली मीटर पाऊस झाला होता. यावेळी चार हजार 20 मिली मीटर पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला आहे. 700 मिली मीटर पाऊस यावेळी जास्त झाला असून हे पाणी साठवण करता आले”

यामुळे आजमितीला धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजच्या तारखेला 88.50 टक्के पाणीसाठा होता. यावेळी धरणात 11.50 टक्के अधिक पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. धरणात मुबलक पाणी आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जास्त वापर करु नये. पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहनही गडवाल यांनी केले.

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहरअभियंता मकरंद निकम म्हणाले, ”पवना धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. महापालिकेने पाणीकपात केली नाही. केवळ विभागनिहाय आठ दिवासातून एका भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. आज देखील 480 एमएलडी पाणी उचलले जाते. सध्या नदीपात्रातूनच पाणी उचलण्यात येत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.