Pimpri: महापालिका कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी; राज्य सरकारकडे पाठविणार प्रस्ताव

अधिकारी, कर्मचा-यांच्या भत्यांमध्ये भरघोस वाढ; अधिकारी- कर्मचारी महासंघाची बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी मिळणार आहे. वेतन पुनर्रचना समितीच्या शिफारशीनुसार आणि कर्मचारी महासंघाच्या मागणीनुसार अधिकारी, कर्मचा-यांना सातवा वेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच विविध भत्यांमध्ये भरघोस वाढ करुन सातव्या वेतन आयोगाच्या अहवालामध्ये त्याचा समावेश केला असून याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. यामुळे महापालिकेतील सुमारे आठ हजार कर्मचारी, अधिका-यांची पगारवाढ होणार आहे. 

सातव्या वेतन आयोगाची अमंलबजावणी आणि विविध भत्तेवाढीबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आणि अधिका-यांची आज (शुक्रवारी) महापालिकेत बैठक झाली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, महासचिव चारुशीला जोशी, मुख्य लेखा व वित्तअधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरिक्षक आमोद कुंभोजकर, आरोद्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता राजन पाटील, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, पराग मुंढे बैठकीला उपस्थित होते. सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून फरकाची रक्कम प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारी व 1 जुलै अशा पाच टप्यांमध्ये देण्यास मान्यता दिली.

  • या भत्यांमध्ये होणार वाढ!
  • चहापान भत्ता 10 रुपयांऐवजी आता प्रतिदिन 20 रुपये मिळणार आहे. वैद्यकीय भत्ता 100 रुपयांऐवजी 300 रुपये, घाण भत्ता 100 ऐवजी 250, धुलाई भत्ता 100 ऐवजी 200 रुपये, सायकल भत्ता 150 ऐवजी 250 रुपये मिळणार आहे. सुरक्षा पर्यवेक्षक, आरोग्य मुकादम, आरोग्य सहाय्यक यांना फिरती भत्ता 1 हजार ऐवजी 1200 रुपये मिळणार आहे. अधिकारी, कर्मचा-यांना चारचाकीला चार हजार 500 तर दुचाकी वापरल्यास 1800 रुपये फिरती भत्ता दिला जाणार आहे.

रजा प्रवास भत्ता वर्ग एक व दोनच्या अधिका-यांना आता चार हजार ऐवजी सहा हजार तर वर्ग तीन, चारच्या कर्मचा-यांना 3500  ऐवजी पाच हजार रुपये मिळणार आहे. गणवेश भत्ता परिचारिकांसाठी 50 रुपयांऐवजी प्रतिमहिना 300 रुपये, आया/शिपाई यांना शिलाई भत्ता (ब्लाऊज) 20 रुपयांऐवजी 200 रुपये मिळणार आहे. पुरुष यांना पॅन्ट शर्ट शिलाई भत्ता 150 रुपयांऐवजी 400 रुपये (एक ड्रेस)मिळणार आहे. अॅप्रन शिलाई भत्ता 40 ऐवजी 100 रुपये वाढ करण्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

  • एनपीए, अपंग भत्ता, रोकड भत्ता शासन निर्णयाप्रमाणे देण्याचे ठरले आहे. तसेच सन 2005 नंतर महापालिपा सेवेत रुजू झालेले अधिकारी/ कर्मचारी यांना नवीन परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली होती. परंतु संबंधित कर्मचा-यांच्या मागणीनुसार नवीन परिभाषित अंशदान योजना रद्द करून पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असून त्याला महासभेची मान्यता घेतली आहे. याबाबतची माहिती कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, महासचिव चारुशीला जोशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.