Pimpri: लिफ्ट बसविण्यास विलंब; प्रशासनाचा निषेध करुन ‘अ’ प्रभागाची मासिक सभा तहकूब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका ‘अ’ प्रभागाच्या इमारतीमध्ये लिफ्ट नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. दोन वर्षांपासून लिफ्ट बसविण्याची मागणी केली जात असताना प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. विद्युत, स्थापत्य, बांधकाम परवानगी विभागाच्या समन्वयाअभावी काम रखडल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने प्रशासनाचा तीव्र निषेध करुन प्रभागाची मासिक सभा 16 मार्चपर्यंत तहकूब केली.

महापालिकेच्या ‘अ’ प्रभागाची मासिक सभा आज (बुधवारी) आयोजित केली होती. प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. लिफ्टचे काम अपुर्णच असल्याने सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. जाब विचारला. परंतु, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे येवू लागली. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्याची सूचना भाजप नगरसेवक बाबू नायर यांनी मांडली. त्याला शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर प्रशासनाचा निषेध करुन 16 मार्चपर्यंत सभा तहकूब करण्यात आली.

बाबू नायर म्हणाले, ”प्रभागातील इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्यात आली नाही.  लिफ्टसाठीचे बांधकाम पुर्ण होऊन दोन वर्ष पुर्ण झाले. तरी, देखील लिफ्ट बसविण्यात आली नाही. कराचा भरणा करण्यासह विविध कामांसाठी नागरिक प्रभाग कार्यालयात येतात. परंतु, लिफ्ट नसल्याने नागरिकांना तिस-या मजल्यावर जाणा-येण्याचा त्रास होतो. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना जाता येत नाही. त्यामुळे लिफ्टचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला सातत्याने केल्या होत्या. ऑक्टोबर 2019 च्या मासिक बैठकीत लिफ्टचे 26 जानेवारी 2020 ला उद्घाटन करण्याचे ठरले होते. परंतु, जानेवारी उलटून दीड महिना झाला तरी लिफ्टचे काम पुर्ण झाले नाही. याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे प्रशासनाचा तीव्र निषेध करुन आजची मासिक सभा 16 मार्चपर्यंत तहकूब केली आहे”.

शिवसेना नगरसेवक अमित गावडे म्हणाले, ”लिफ्ट बसविण्याबाबत सातत्याने सूचना केल्या. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. लिफ्टबाबत विचारणा केल्यास उडावाउडवीची उत्तरे दिली जातात. स्थापत्य, बांधकाम परवानगी विभागात  समन्वय नाही. त्यामुळे काम रखडले आहे. अधिका-यांकडून जबाबदारीने कामे केली जात नाहीत. प्रशासनाने कामात सुधारणा करणे आवश्यक आहे”.

कार्यकारी अभियंता संजय खाबडे म्हणाले, ”लिफ्ट’साठी विद्युत निरीक्षकांची मान्यता  घेण्यास जास्त कालावधी गेला. जुन्या इमारतीत लिफ्ट बसविली जाणार आहे. त्यामुळे अनेक अडचणी होत्या. लिफ्टचे थोडे काम शिल्लक असून दीड महिन्यात पुर्ण होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.